लाेकमत न्यूज नेटवर्कगडचिराेली : शासनाने ठरविल्यानुसार जिल्ह्यात आरोग्य, स्वच्छता यासारख्या सरकारी कर्मचाऱ्यांसाठी पहिल्या टप्प्यात कोरोनाबाबत लसीकरणाचा कार्यक्रम राबविण्यात येणार आहे. त्याअनुषंगाने तालुका आराेग्य अधिकारी व वैद्यकीय अधिकाऱ्यांचे प्रशिक्षण सुरू आहे. पहिल्या टप्प्यात लस दिल्या जाणाऱ्या कर्मचाऱ्यांची संख्या जवळपास ११ हजार आहे. मात्र एवढ्या लस कुठे साठवून ठेवणार, याची उत्तर सध्यातरी आरोग्य प्रशासनाकडे नाही. त्याबाबतचे नियाेजन सध्यातरी थंडबस्त्यात आहे.एका बुथवर १०० कर्मचाऱ्यांना लस देण्याची व्यवस्था जि.प.आराेग्य विभागाच्या वतीने करण्यात येणार आहे. दुसऱ्या टप्प्यात नगर पालिका कर्मचारी, फ्रन्ट लाईन वर्कर आदींना तसेच तिसऱ्या टप्प्यात ५० वर्षांवरील वृद्ध नागरिकांना आणि शुगर, बीपीचा त्रास असलेल्यांना लस देण्यात येणार आहे.
फ्रिजर व आयएआरची व्यवस्थागडचिराेली जि.प. अंतर्गत एकूण ४५ प्राथमिक आराेग्य केंद्र आहेत. प्रत्येक पीएचसीस्तरावर काेराेना लस साठवणुकीसाठी फ्रिजर व आयएलआर व्यवस्था आहे. पण त्यांच्या काेल्ड बाॅक्सची साठवण क्षमता किती यानुसार नियोजन झालेले नाही. लसीकरणाच्या ठिकाणी तीन खाेल्यांची व्यवस्था करण्यात आली आहे. एक खाेली कर्मचाऱ्यांना बसण्यासाठी, दुसऱ्या खाेलीत लस देण्याची व्यवस्था राहणार आहे. लस घेतलेल्या कर्मचारी व नागरिकांना अर्धा तास विश्रांती घेण्यासाठी तिसरी स्वतंत्र खाेली राहणार आहे, अशी माहिती जिल्हा परिषद आराेग्य विभागाने दिली आहे.
शासनाच्या निर्देशानुसार काेविड लसीकरणाचा पहिला टप्पा जिल्ह्यात राबविण्यात येणार आहे. लस केव्हा येणार व किती येणार, याबाबत अजूनही शासनाकडून तसेच वरिष्ठ कार्यालयाकडून माहिती मिळाली नाही. मात्र लसीकरणाचा कार्यक्रम नियाेजनबद्ध व यशस्वीरित्या पार पाडण्यासाठी जिल्हास्तरावर जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली टास्क फाेर्सची स्थापना करण्यात आली आहे. तालुकास्तरावर एसडीओंच्या अध्यक्षतेखाली टास्कफाेर्स गठित केला आहे. पहिल्या टप्प्यात आराेग्य विभागासह काेविडशी संबंधित कार्य करणाऱ्या सर्व शासकीय व खासगी कर्मचाऱ्यांना ही लस देण्यात येणार आहे. त्यानंतर टप्प्याटप्प्याने सामान्य नागरिकांना लस देण्याची व्यवस्था करण्यात येईल. - डाॅ.शशिकांत शंभरकर, जिल्हा आराेग्य अधिकारी, जि.प.गडचिराेली