गडचिराेली जिल्ह्यात आदिवासी विकास महामंडळ व जिल्हा मार्केटिंग फेडरेशन यांच्यामार्फत आधारभूत किमतीने धान खरेदी केले जाते. यावर्षी शासनाने सर्वसाधारण धानासाठी प्रति क्विंटल १ हजार ८६८ रुपये तर चांगल्या प्रतीच्या धानासाठी प्रति क्विंटल १ हजार ८८८ रुपये एवढी आधारभूत किंमत जाहीर केली. त्याचबराेबर खरिपाच्या धानासाठी प्रति क्विंटल ७०० रुपये बाेनस जाहीर केला आहे.
यावर्षीच्या खरीप हंगामात आदिवासी विकास महामंडळामार्फत ५६ हजार ९८९ शेतकऱ्यांकडून १६ लाख ६१ हजार ७६० क्विंटल धान खरेदी केले. या धानाची किंमत ३१० काेटी ४१ लाख ६७ हजार ९२२ रूपये एवढी हाेते. त्यावर पुन्हा प्रति क्विंटल बाेनस द्यायचा आहे. बाेनसची रक्कम ११६ काेटी ३२ लाख ३२ हजार एवढी हाेते. सर्वप्रथम शेतकऱ्यांच्या खात्यात १८६८ रुपये प्रति क्विंटलप्रमाणे धानाची रक्क्म जमा केली जाते. त्यानंतर काही दिवसांनी धानाच्या बाेनसची रक्कम दिली जाते. खरिपाचे धान ३१ मार्चपर्यंतच खरेदी केले जातात. त्यानंतर धान खरेदी बंद केली जाते. हिशेब पूर्ण झाल्यानंतर बाेनसची रक्कम जवळपास मे महिन्याच्या शेवटी शेतकऱ्यांच्या खात्यात जमा केली जात हाेती. यावर्षी मात्र जून महिना संपण्याच्या मार्गावर असताना अजूनही बाेनची रक्कम शेतकऱ्यांना मिळाली नाही.
बाॅक्स
शेतीसाठी उपयाेगात आला असता पैसा
शेतीचा हंगाम सुरू झाला आहे. शेतकऱ्यांना खते, बियाणी, किटकनाशके खरेदी करावी लागतात. तसेच शेतीच्या मशागतीसाठी बराच खर्च होतो. त्यामुळे शेतकरी आर्थिक अडचणीत येत असल्याने त्याला पैशाची गरज राहते. अशावेळी धानाच्या बाेनसची रक्कम मिळेल अशी आशा शेतकरी बाळगून हाेता. मात्र, अजूनही बाेनसची रक्कम मिळाली नाही. त्यामुळे कर्ज काढावे लागत आहे. मागील वर्षी मे महिन्याच्या शेवटी अनेक शेतकऱ्यांच्या खात्यात बाेनसची रक्कम जमा झाली हाेती. यावर्षी मात्र अजूनही रक्कम मिळाली नाही.
प्रत्येक शेतकऱ्याचे किमान ५० क्विंटल धान खरेदी केले जाते. त्या धानाची ७०० रुपये प्रमाणे ३५ हजार रुपये एवढी रक्कम हाेते. एवढी रक्कम मिळाली असती तर कर्ज काढण्याची पाळी शेतकऱ्यांवर आली नसती.
चुकारेही मिळाले नाही
खरीप हंगामात धानाची विक्री केलेल्या काही शेतकऱ्यांना तर अजूनपर्यंत चुकारेही मिळाले नाही. हातात रुपयाही मिळाला नसल्याने हे शेतकरी कमालीचे आर्थिक अडचणीत आले आहेत. दैनंदिन खर्च कसा भागवावा तसेच शेतीचा खर्च कसा करावा असा प्रश्न पडला आहे. किमान धानाचे चुकारे कसे द्यावे असा प्रश्न पडला आहे.
बाॅक्स
खरिपातील धान खरेदी
शेतकरी संख्या - ५६,९८९
खरेदी (क्विंटल) - १६,६१,७६०
किंमत - ३१०,४१,६७,९२२
अपेक्षित बाेनस - ११६,३२,३२,०००
बाॅक्स ....
६२ हजार क्विंटल उन्हाळी धान खरेदी
१ मे पासून जिल्ह्यात उन्हाळी धान खरेदीला सुरुवात झाली. जिल्ह्यातील १ हजार ५५९ शेतकऱ्यांचे ६२ हजार ८९ क्विंटल धान खरेदी करण्यात आले. या धानाची किंमत ११ काेटी ६९ लाख ८२ हजार ७०० रुपये एवढी हाेते. या धानावर मात्र बाेनस दिला जात नाही.