वैरागड : गौण वनोपजाची साठवणूक करण्याच्या दृष्टीने स्थानिक वनविभाग कार्यालयाच्या मागील बाजूस गोदाम बांधण्यात आले. या गोदामाचे लोकार्पण नुकतेच करण्यात आले. त्यामुळे मोहफूल, डिंक, टोळ यासह अन्य गौण वनोपजाची साठवणूक करण्यास मदत होणार आहे. गोदामाचे उद्घाटन आरमोरीचे वनपरिक्षेत्राधिकारी आर. एस. बोढे यांच्याहस्ते करण्यात आले. यावेळी सरपंच सेवानंद सहारे, संयुक्त वनव्यवस्थापन समितीचे अध्यक्ष प्रमोद तावेडे, तंटामुक्त समितीचे अध्यक्ष जगदीश पेंदाम, कंत्राटदार विजय लाकडे, महादेव दुमाने, सावजी धनकर, पीतांबर लांजेवार, प्रेमानंद तागडे, उर्मिला सिडाम, शारदा तावेडे, कमल शेंदे आदी उपस्थित होते. वन विभागामार्फत मोहफूल, डिंक, पळस बी, टोळ याच्यासह अन्य वनोपजाची खरेदी केली जाते. खरेदी केलेल्या वनोपजाची योग्य साठवणूक व वस्तू दीर्घकाळ टिकण्यासाठी गोदामाची निर्मिती करण्यात आली. त्यामुळे वनोपजाचे संरक्षण केले जाईल, असे प्रतिपादन वनपरिक्षेत्राधिकारी आर. एस. बोढे यांनी केले. संचालन बी. एन. चिडे तर आभार बी. सी. मडावी यांनी मानले. यशस्वीतेसाठी प्रदीप कोडमलवार, एम. एन. कळमकर, किरमिरे, भोयर यांनी सहकार्य केले. कार्यक्रमाला वनविभागाचे अधिकारी व वनकर्मचारी उपस्थित होते. (वार्ताहर)
वैरागड येथील गोदामात होणार वनोपजाची साठवणूक
By admin | Updated: July 19, 2014 23:55 IST