पावसाळ्यापूर्वी खरीप हंगामासाठी शेतकऱ्यांची धावपळ सुरु असते. काही शेतकरी शेतीच्या नांगरणीसाठी कामाला लागलेले आहे तर काही शेतीच्या मशागतीची कामे करीत आहे. पावसाळा सुरु होण्यापूर्वी शेती पेरणीसाठी सज्ज करुन ठेवली जाते. तसेच शेतकऱ्यांची आर्थिक परिस्थिती चांगली नसल्याने व शेतीचे महागडे बियाणे खरेदी करण्यासाठी पैसे नसल्याने बँकेकडून पीक कर्ज उचलत असतात. आष्टी येथे विदर्भ कोकण ग्रामीण बँक, भारतीय स्टेट बँक व जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक अशा तीन मुख्य बँका व काही पतसंस्था आहेत. आष्टी परिसरातील इल्लूर, ठाकरी, कुनघाडा, चपराळा, चौडमपल्ली, अनखोडा, उमरी, चंदनखेडी, मार्कंडा, जयरामपूर आदी गावातील शेतकरी या बँकेतून कर्ज घेत असतात. सर्वात जास्त १७२ शेतकऱ्यांना १ काेटी, ३० लाख, ८४ हजाराचे कर्ज विदर्भ कोकण ग्रामीण बँकेने वितरित केले आहे. त्यानंतर १५ मे पर्यंत जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेने २९४ शेतकऱ्यांना १ काेटी, १६ लाख १६ हजार सातशे रूपयांचे कर्ज वाटप केले. तसेच भारतीय स्टेट बँकेने १५ मे पर्यंत सर्वात कमी दोन शेतकऱ्यांना एक लाख २५ हजार रुपये कर्ज वाटप केलेले आहे. शेतकऱ्यांची कर्ज घेण्यासाठी विदर्भ कोकण ग्रामीण बँक व जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक या दोनच बँकेकडे पसंती आहे.
पीक कर्ज वाटपात विदर्भ कोकण ग्रामीण बँक अव्वल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 26, 2021 04:36 IST