गडचिरोली : सध्या धान शेती पूर्व मशागतीची कामे अंतिम टप्प्यात आहेत. रोहिणी नक्षत्रावर काही शेतकरी धूळवाफेच्या पेरण्यांना प्रारंभ करीत असतात. त्यासाठी लागणारी खते, बी-बियाणे खरेदी शेतकऱ्यांनी सुरू केली आहे. मात्र, खरेदी करीत असताना, शेतकऱ्यांनी सावधानता बाळगण्याचे आवाहन कृषी विभागाने केले आहे.
शेतकऱ्यांनी गुणवत्ता व दर्जाची हमी देणाऱ्या अधिकृत विक्रेत्यांकडूनच खरेदीसाठी प्राधान्य द्यावे. बनावट/भेसळयुक्त बियाणे, खते, कीटकनाशके खरेदी टाळण्यासाठी अधिकृत विक्रेत्यांकडे पावतीसह खरेदी करावी. खरेदी केलेल्या बियाणांचे वेष्टण/पिशवी, टॅग, खरेदीची पावती व त्यातील थोडे बियाणे पिकाची कापणी होईपर्यंत जपून ठेवावे. भेसळीची शंका दूर करण्यासाठी बियाणांची पाकिटे सीलबंद/मोहरबंद असल्याची खात्री करावी. बियाणे उगवणीच्या खात्रीसाठी पाकिटावर अंतिम मुदत पाहून घ्यावी. कमी वजनाच्या निविष्ठा तसेच छापील किमतीपेक्षा जास्त किमतीने विक्री अथवा इतर तक्रारीसाठी जवळच्या कृषी विभागाच्या कर्मचाऱ्यांशी संपर्क साधावा. कीटकनाशके अंतिम मुदतीच्या आतील असल्याची खात्री करावी. शेतकऱ्यांनी तक्रारीविषयी माहिती प्रत्यक्ष/ दूरध्वनी/ ई-मेल/ एसएमएस, आदीद्वारे देऊन शासनाच्या गुणनियंत्रण अभियानात सहभागी होण्याचे आवाहन जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी भाऊसाहेब बऱ्हाटे यांनी केले आहे.
कृषी निविष्ठांविषयी असलेल्या अडचणी/तक्रारी सोडविण्यासाठी, मार्गदर्शनासाठी कृषी विभागाच्या टोल फ्री क्रमांक १८००२३३४००० वर संपर्क साधावा, असे आवाहन जिल्हा गुण नियंत्रण निरीक्षक संजय मेश्राम यांनी केले आहे.
बाॅक्स....
१२ तास सुरू राहतील कृषी केंद्रे
- गडचिराेली जिल्ह्यात काेविड संसर्गाच्या पार्श्वभूमीवर दुकानांची वेळ व टाळेबंदीबाबत धाेरण आखण्यात आले आहे. अत्यावश्यक सेवेमध्ये माेडत असलेली कृषी केंद्र दुकाने सुरू ठेवण्यास मुभा देण्यात आली आहे. गडचिराेली जिल्ह्यातील सर्व कृषी सेवा केंद्रे व त्यांच्याशी निगडित उत्पादन व वाहतूक सकाळी ७ ते सायंकाळी ७ या वेळेत सुरू ठेवण्याची अनुमती जिल्हा प्रशासनाने दिली आहे. यासंदर्भात जिल्हाधिकाऱ्यांनी आदेश निर्गमित केले आहे.
- बियाणे, खते, कीटकनाशके, कृषी साहित्यांचा अडथळ्यांविरहित पुरवठा करणे, कृषी संबंधित कार्य व त्यांच्या संबंधित कृषी सेवा केंद्र सुरू ठेवण्याबाबत कृषी आयुक्त पुणे यांनी जिल्हा परिषदेला कळविले हाेते. त्याअनुषंगाने जिल्हाधिकाऱ्यांनी आदेश निर्गमित करून कृषी केंद्र सुरू ठेवण्याची वेळ सकाळी ७ ते सायंकाळी ७ ही दिली आहे.