गडचिरोली : जिल्हा परिषद प्राथमिक शिक्षकांचे आॅनलाईन वेतन करण्याची प्रक्रिया अजूनही पूर्ण न झाल्याने नोव्हेंबर व डिसेंबर या दोन महिन्यांचे वेतन शिक्षकांना मिळालेले नाही. त्यामुळे शिक्षक आर्थिक अडचणीत सापडले आहेत. शिक्षकांच्या वेतनासाठी लागणारा मासिक खर्च गटशिक्षणाधिकाऱ्यांनी जिल्हा परिषदेकडे सादर करावा लागतो. मात्र बहुतांश गटशिक्षणाधिकाऱ्यांनी आॅक्टोबर ते फेब्रुवारी या चार महिन्यांचा अंदाजपत्रक सादर केले नाही. त्यामुळे नोव्हेंबर महिन्यात शिक्षकांचे वेतन प्राप्त झाले नाही. ही बाब शिक्षक संघटनांनी जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी संपदा मेहता व शिक्षणाधिकारी उल्हास नरड यांच्या निदर्शनास आणून दिली. शिक्षणाधिकाऱ्यांनी अंदाजपत्रक तत्काळ सादर करण्याचे निर्देश गटशिक्षणाधिकाऱ्यांना दिल्यानंतर गटशिक्षणाधिकाऱ्यांनी शिक्षकांच्या खर्चाचे अंदाजपत्रक डिसेंबर महिन्यात सादर केले.अंदाजपत्रक सादर करण्याची समस्या मिटल्यानंतर मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी शिक्षकांचे वेतन आॅनलाईन पध्दतीने करण्याचा निर्णय घेतला. मात्र जिल्ह्यातील एकूण १ हजार ५४० शाळांपैकी १८७ शाळांची आॅनलाईन प्रक्रिया झालेली नाही. त्यामुळे या शाळांमधील जवळपास शिक्षकांचे आॅनलाईन पध्दतीने वेतन देणे शक्य नसल्याने त्यांच्याबरोबरच जिल्हाभरातील शिक्षकांचेसुध्दा वेतन झाले नाही. जिल्हाभरात एकूण ४ हजार ७०० प्राथमिक शिक्षक आहेत. या शिक्षकांना दिवाळीनंतर वेतनच मिळाले नाही. दिवाळीमध्ये मिळालेले वेतन दिवाळीच्या सणासाठी खर्च झाले. जानेवारी महिन्याचाही पहिला आठवडा संपला आहे. दोन महिन्यांपासून वेतन थकल्याने प्राथमिक शिक्षकांसमोर फार मोठी आर्थिक अडचण निर्माण झाली आहे. शिक्षकांचे वेतन त्वरित देण्यात यावे, अशी मागणी महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समितीच्या पदाधिकाऱ्यांनी जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी व शिक्षणाधिकारी यांचे प्रत्यक्ष भेट घेऊन केली आहे. (नगर प्रतिनिधी)
दोन महिन्यांपासून शिक्षकांचे वेतन थकीत
By admin | Updated: January 10, 2015 22:54 IST