५ व ६ एप्रिलला परीक्षा : सर्व व्यवस्थापन व माध्यमांच्या विद्यार्थ्यांसाठी बंधनकारक;शिक्षण विभागातर्फे नियोजन सुरूगडचिरोली : पहिली ते आठवीपर्यंतच्या विद्यार्थ्यांची दुसरी गुणवत्ता चाचणी ५ व ६ एप्रिल रोजी घेतली जाणार असून जिल्ह्यातील सुमारे १ लाख २२ हजार विद्यार्थी ही परीक्षा देणार आहेत. परीक्षा सुरळीत पार पाडण्यासाठी शिक्षण विभागाने नियोजनही केले आहे. भाषा व गणित विषयाचे पेपर महाराष्ट्र राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण संस्था उपलब्ध करून देणार आहे. त्रयस्त संस्था घेणार ६० शाळांमध्ये परीक्षागुणवत्ता चाचणी घेण्यावर नियंत्रण राहावे, त्याचबरोबर प्रत्येक तालुक्यातील विद्यार्थ्यांच्या प्रगतीच्या आढाव्याचा अंदाज वरिष्ठ अधिकाऱ्यांना यावा, यासाठी प्रत्येक तालुक्यातील पाच शाळांमध्ये त्रयस्त संस्थेच्या मार्फतीने परीक्षा घेतली जाणार आहे. पुणे येथील मॅस्कॉन कम्प्युटर्स सर्व्हिसेस या संस्थेची त्रयस्त संस्था म्हणून शासनाने नेमणूक केली आहे. या संस्थेचे प्रतिनिधी संबंधित शाळांमधील परीक्षा घेणार आहेत. गुणवत्तेत मागे असलेल्या विद्यार्थ्यांचा शोध घेता येऊन त्यांना इतर विद्यार्थ्यांसोबत आणण्यासाठी शिक्षकाला विशेष प्रयत्न करता यावे, यासाठी प्रगत शैक्षणिक महाराष्ट्र या कार्यक्रमांतर्गत विद्यार्थ्यांची चाचणी घेण्याचे नमूद केले आहे. विशेष म्हणजे या चाचणीसाठी पुणे येथून महाराष्ट्र राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषदेने तयार केलेले पेपर वापरले जाणार आहेत. राज्यभरातील दोन कोटी तर गडचिरोली जिल्ह्यातील सुमारे १ लाख २२ हजार विद्यार्थी ही परीक्षा देणार आहेत. याअगोदर आॅक्टोबर महिन्यामध्ये अशा प्रकारची गुणवत्ता चाचणी घेण्यात आली होती. या चाचणीमध्ये जिल्ह्यातील जवळपास ५० टक्के विद्यार्थी प्रगत असल्याचे आढळून आले होते. ही परीक्षा सर्व व्यवस्थापनाच्या, सर्व माध्यमांच्या विद्यार्थ्यांसाठी बंधनकारक करण्यात आली आहे. ५ एप्रिल रोजी भाषा तर ६ एप्रिल रोजी गणित विषयाची चाचणी घेतली जाणार आहे. लेखी परीक्षेबरोबरच तोंडी व प्रात्यक्षिक परीक्षा सुद्धा त्याच दिवशी घेण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. पहिल्या गुणवत्ता चाचणीमध्ये जिल्ह्यातील सुमारे ५० टक्के विद्यार्थी अप्रगत असल्याचे आढळून आले होते. या विद्यार्थ्यांसाठी शिक्षकांनी विशेष वर्ग घेऊन त्यांना प्रगत करण्याचे निर्देश शासनाच्या मार्फतीने दिले होते. ज्ञानरचनावादाप्रमाणे अध्यापन, डिजीटल यंत्रांचा वापर करून अध्यापन, विशेष वर्गांचे आयोजन करून अप्रगत विद्यार्थ्यांना प्रगत करण्याचा प्रयत्न शिक्षकांनी केला आहे. मात्र हे प्रयत्न किती यशस्वी ठरले याचे मूल्यमापन ५ व ६ एप्रिल रोजी होणाऱ्या गुणवत्ता चाचणीतून दिसून येणार आहे. परीक्षेसाठी शिक्षण विभागाने नियोजन सुरू केले आहे. (नगर प्रतिनिधी)
सव्वा लाख विद्यार्थी देणार गुणवत्ता चाचणी
By admin | Updated: March 27, 2016 01:35 IST