वाढत्या अतिक्रमणाचा परिणाम : सणासुदीच्या काळात वाहनांची प्रचंड गर्दी गडचिरोली : स्थानिक नगर पालिका प्रशासनाने पुढाकार घेऊन काही दिवसापूर्वी चामोर्शी, चंद्रपूर मार्गावरील तसेच इंदिरा गांधी चौक परिसरातील अतिक्रमण काढले. त्यामुळे सदर मार्ग मोकळे झाले आहेत. मात्र शहरातील सर्वात जुनी बाजारपेठ असलेल्या त्रिमुर्ती चौक परिसरात व मार्गावर अतिक्रमण वाढल्यामुळे वारंवार वाहतुकीची कोंडी होण्याचा प्रश्न जटील झाला आहे. या मार्गावर पार्र्किंगची व्यवस्था नसल्याने व अतिक्रमणामुळे आवागमनास प्रचंड अडचण निर्माण होते. चंद्रपूर मार्गावरून त्रिमुर्ती चौक ते आठवडी बाजाराकडे जाणाऱ्या मार्गावर अनेक मोठे व लहान दुकाने आहेत. शिवाय या मार्गावर हातगाड्याही लावल्या जातात. सणासुदीच्या काळात या मार्गावर दुकानांची संख्या प्रचंड वाढते. परिणामी वाहन नेण्यास जागाही उरत नाही. पार्कींगचीही व्यवस्था नसल्याने एखादे मोठे वाहन आल्यावर वाहतुक काही वेळ ठप्प होते. सदर प्रश्न गेल्या अनेक दिवसांपासून कायम आहे. सध्या मकरसंक्राती सणा निमित्त वाण व इतर साहित्याचे दुकान याच मार्गावर लावण्यात आले आहेत. सणानिमित्त महिला ग्राहकांची बाजारपेठेत दररोज गर्दी होत आहे. त्यामुळे येथे वाहतुकीची कोंडी होत आहे. स्थानिक नगर पालिका प्रशासनाला या भागातील वाहतूक कोंडीच्या प्रश्नावर कायमस्वरूपी तोडगा काढता आला नाही. याच परिसरात दैनंदिन गुजरी बाजार असल्याने दररोज येणाऱ्या ग्राहकांची संख्याही येथे मोठी असते. अनेक ग्राहक मिळेल त्या ठिकाणी आपले दुचाकी वाहने उभी करतात. परिणामी आवागमनास रस्ताच उरत नाही. सदर मार्गावरील वाहतूक सुरळीत करण्यासाठी कायमस्वरूपी मार्ग काढण्याची गरज आहे. (स्थानिक प्रतिनिधी)
मुख्य बाजारपेठेत वाहतुकीची कोंडी
By admin | Updated: January 15, 2017 01:36 IST