लाेकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली : जिल्ह्यात मागील पाच वर्षांच्या तुलनेत या वर्षी भूजल सर्वेक्षण व विकास यंत्रणेने केलेल्या मार्चअखेरच्या पाणीपातळी तपासणीअंती जिल्ह्याच्या पाणीपातळीत ०.३७ मीटरने वाढ झाल्याचे स्पष्ट झाले आहे. असे असले तरी जिल्ह्यातील अनेक भागांत पाण्याची गंभीर समस्या कायम आहे. बारमाही वाहणाऱ्या नद्यांचा जिल्हा म्हणून गडचिरोली जिल्ह्याची ओळख आहे. मात्र उन्हाळ्यात अनेक भागांत पाण्याचा प्रश्न गंभीर होऊन बसतो. विशेषत: दुर्गम व ग्रामीण भागांना याचा सर्वाधिक फटका बसत आलेला आहे. अनेक ठिकाणी ग्रामस्थ पाण्यासाठी भटकंती करीत असतात. दरम्यान मागील वर्षी पावसाळ्यात जिल्ह्यात सरासरीपेक्षा अधिक पाऊस कोसळल्याने भूगर्भातील पाणीपातळीमध्ये वाढ झाली आहे. भूजल सर्वेक्षण विभागाने मार्चअखेर जिल्ह्यातील ११२ विहिरींच्या पाणीपातळीचे सर्वेक्षण केले.
जिल्ह्यातील १५३ हातपंप बंद- जिल्ह्यात बाराही तालुके मिळून एकूण १० हजार ४८४ हातपंप आहेत. यांतील ५३२ हातपंप आतापर्यंत दुरुस्त करण्यात आले आहेत; तर तब्बल १५३ हातपंप बंद अवस्थेत आहेत. हातपंप बंद असल्यामुळे ग्रामीण भागातील नागरिकांना पाण्यासाठी भटकंती करावी लागत आहे. त्यामुळे संबंधित ग्रामपंचायतीने आपल्या कार्यक्षेत्रातील हातपंप दुरुस्त करण्यासाठी पुढाकार घेणे गरजेचे आहे.
कुरखेडा, कोरची, देसाईगंजात घट- भूजल सर्वेक्षण व विकास यंत्रणेने जिल्हाभरातील केलेल्या गावातील सार्वजनिक विहिरींच्या तपासणीअंती देसाईगंज, कुरखेडा व देसाईगंज (वडसा) तालुक्यांत मागील पाच वर्षांच्या तुलनेत पाणीपातळीत घट झाल्याचे निदर्शनास येत आहे. देसाईगंज तालुक्यातील पाणीपातळीत ०.२० मीटर घट आढळून आली. कुरखेडा ०.२६, तर कोरची ०.२५ मीटर एवढी घट आढळून आली आहे. यामुळे या तालुक्यातील ग्रामीण भागात पाण्याचा गंभीर प्रश्न निर्माण झाला असल्याचे स्पष्ट दिसून येत आहे. पाण्याचा याेग्य वापर करण्याची गरज आहे.