लाेकमत न्यूज नेटवर्कगडचिराेली : खरीप हंगामात बियाणे, खते व कीटकनाशकांचा काळाबाजार हाेताे. यात शेतकऱ्यांची फसवणूक हाेते. तसेच शेतकऱ्यांना तक्रारी करण्यासाठी साेयीसुविधा नसते. ही साेय उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने जिल्हास्तरावर नियंत्रण कक्ष (कंट्राेल रूम) स्थापन करण्यात आले आहे. खते, बियाणे व इतर बाबीसंदर्भात काळाबाजार दिसताच थेट नियंत्रण कक्षात तक्रार देता येणार आहे. चालू खरीप हंगामाला काही दिवसांतच सुरूवात हाेणार आहे. बियाणे खरेदी करण्यासाठी शेतकऱ्यांची लगबग सुरू झाली आहे. अशावेळी शेतकऱ्यांना बियाणांची निवड करताना अडचणी येतात. शेतकऱ्यांना येणाऱ्या अडचणीबाबत तक्रारी करता याव्यात, यासाठी जिल्हास्तरावर कंट्राेल रूम स्थापन करण्यात आले आहे. सदर कंट्राेल रूममध्ये राज्यशासनाचा कृषी विभाग व जिल्हा परिषदेच्या कृषी विभागाच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. यासाठी भ्रमणध्वनी क्रमांक उपलब्ध करून दिला आहे. तक्रार नाेंदविल्यानंतर लगेच शेतकऱ्यांच्या समस्येचे निराकरण केले जाणार आहे. कृषी निविष्ठांची गुणवत्ता, किंमत, साठेबाजी व लिंकिंगबाबत असलेल्या तक्रारींचे निवारण केले जाईल, अशी माहिती जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी बसवराज मास्ताेळी यांनी दिली.
या क्रमांकावर नाेंदवा तक्रार- कृषी निविष्ठांबाबत असलेल्या तक्रारी कृषी विभागापर्यंत पाेहाेचविण्यासाठी शेतकऱ्यांना ९४०४५३५४८१ या क्रमांकावर संपर्क साधता येईल. हा क्रमांक शेतकऱ्यांना तक्रार नाेंदविण्यासाठी समपात (डेडीकेटेड) करण्यात आला असून सकाळी ८ ते रात्री ८ वाजतापर्यंत शेतकऱ्यांना भ्रमणध्वनीवर तक्रार नाेंदविता येईल.
शेतकऱ्यांनी काय खबरदारी घ्यावी?
- खरीप हंगाम सुरू झाल्यानंतर कृषी केंद्रांवर निविष्ठा खरेदी करण्यासाठी शेतकऱ्यांची गर्दी उसळते. अशावेळी शेतकऱ्यांची फसवणूक हाेण्याची शक्यता असते. त्यामुळे शेतकऱ्यांनी गुणवत्ता व दर्जाची हमी देणाऱ्या अधिकृत विक्रेत्याकडूनच कृषी निविष्ठा खरेदी करावी. बियाणे खरेदी करताना खरेदीची पक्की पावती, लाॅट नंबर, अंतिम मुदत तपासावी. साेबतच ते जपून ठेवावे. अनधिकृत विक्रेत्याकडून बियाणे खरेदी करू नये, असे जिल्हा गुण नियंत्रण निरीक्षक संजय मेश्राम यांनी कळविले.