आमदारांना निवेदन : शिक्षक परिषदेच्या पदाधिकाऱ्यांची चर्चाचामोर्शी : पंचायत समिती अंतर्गत येत असलेल्या शिक्षकांचे मागील तीन महिन्यांपासून वेतन रखडले आहे. सदर वेतन तत्काळ देण्यात यावे व वेतनास विलंब करणाऱ्या अधिकारी व कर्मचाऱ्यांवर शासन निर्णयाप्रमाणे कारवाई करावी, अशी मागणी महाराष्ट्र शिक्षक परिषद तालुका शाखा चामोर्शीच्या वतीने आ. डॉ. देवराव होळी व चामोर्शी संवर्ग विकास अधिकारी यांना दिलेल्या निवेदनातून केली आहे. निवेदनात म्हटले आहे की, शिक्षकांची वेतन प्रणाली सुरळीत करण्याकरिता मुख्याध्यापक व शिक्षक यांच्या प्रशिक्षणाचे आयोजन करण्यात यावे, १४ केंद्रप्रमुखांचे वेतन तत्काळ काढावे, १९९२ व २००० मध्ये नियुक्त झालेल्या शिक्षकांची थकीत वेतनवाढ द्यावी, २००५-०६ मध्ये नियुक्त झालेल्या ४७ अप्रशिक्षित शिक्षकांचे आॅनलाईन थकीत वेतन मंजूर आहे व याचा निधीही प्राप्त झाला आहे. मात्र अडवणुकीचे धोरण अवलंबून या शिक्षकांना वेतनापासून वंचित ठेवले जात आहे. पंचायत समिती चामोर्शी येथील प्रत्येक अधिकारी, कर्मचाऱ्याच्या कामाची सनद तयार करून जबाबदारी व क्रमवारिता निश्चित करावी, शिक्षक व केंद्रप्रमुखांची सेवा पुस्तक अद्यावत करावे, हळदी येथील शिक्षक अमोल चव्हाण, भिक्षी येथील शिक्षक वैद्य, प्रियदर्शनी येथील शिक्षक एम. बी. कुळसंगे यांचे आॅक्टोबर २०१५ चे वेतन काढण्यात यावे, व्ही. एल. तुलावी हे चामोर्शी तालुक्यातील कोणत्याही शाळेत कार्यरत नसतानाही त्यांचे नोव्हेंबर, डिसेंबर महिन्याचे वेतन काढण्यात आले. यासाठी दोषी असलेल्या अधिकाऱ्यांवर कारवाई करावी आदी मागण्यांसंदर्भात बीडीओंसोबत चर्चा करण्यात आली. यावेळी तालुकाध्यक्ष नीलेश खोब्रागडे, उपाध्यक्ष उद्धव केंद्रे व तालुक्यातील शिक्षक उपस्थित होते.मागण्या मान्य न झाल्यास २ मे पासून साखळी उपोषण व ५ मे पासून आमरण उपोषण करण्याचा इशारा दिला आहे. (शहर प्रतिनिधी)
शिक्षकांचे वेतन रखडले
By admin | Updated: May 1, 2016 01:13 IST