आरमाेरी : काेराेनाबाधितांच्या उपचाराची अडचण लक्षात घेऊन येथील रहिवासी डाॅ.के.टी.किरणापुरे व रजनी किरणापुरे यांनी पुढाकार घेऊन येथील उपजिल्हा रुग्णालयाला २० ऑक्सिजन सिलिंडरचा पुरवठा केला.
येथील रुग्णालयात कोरोना संसर्गाचे रुग्ण भरती असून ऑक्सिजन कमी असलेल्या रुग्णांना कोरोना उपचारासोबतच ऑक्सिजनची फार आवश्यकता असते. ऑक्सिजन उपलब्ध न झाल्यास रुग्ण मृत्युमुखी पडू शकतो ही बाब किरणापुरे दाम्पत्याच्या लक्षात आली. दरम्यान त्यांनी रुग्णालयाला भेट देऊन वैद्यकीय अधीक्षक डॉ.छाया उईके यांची भेट घेऊन परिस्थिती जाणून घेतली. त्यानंतर सेवाभावी वृत्तीने उपजिल्हा रुग्णालयास २० ऑक्सिजनचे सिलिंडर वाहतूक मजुरी खर्चासह त्यांनी उपजिल्हा रुग्णालयात पोहोचविले.
याप्रसंगी रुग्णालयाच्या वैद्यकीय अधीक्षक डॉ. छाया उईके यांच्या हस्ते किरणापुरे दाम्पत्यांना प्रमाणपत्र देऊन काैतुक करण्यात आले.