विभागीय आयुक्तांना साकडे : दीपक आत्राम यांच्या नेतृत्वात शिष्टमंडळ भेटलेआलापल्ली : महाराष्ट्र-तेलंगणा सीमेवर सिरोंचा तालुक्याच्या पातागुडम गावाला लागून तेलंगणा राज्याच्या हद्दीत मेडीगट्टा-कालेश्वर प्रकल्पाचे काम सुरू आहे. या सिंचन प्रकल्पामुळे सिरोंचा तालुक्यातील २२ गावातील शेतजमीन पाण्याखाली येणार आहे. जवळजवळ ८ हजार हेक्टर शेतीला याचा फटका बसणार आहे. या धरणाच्या कामाचे संयुक्त सर्वेक्षणही दोन राज्याच्या वतीने करण्यात आले. या धरणाला स्थानिकांचा प्रचंड विरोध आहे. त्यामुळे तेलंगणा सरकारवर दबाव आणून या धरणाचे काम थांबविण्यात यावे, अशी मागणी आविसंचे नेते माजी आ. दीपक आत्राम यांच्या नेतृत्वातील शिष्टमंडळाने नागपूर विभागीय आयुक्तांकडे २९ फेब्रुवारी रोजी भेट घेऊन केली आहे.या शिष्टमंडळात जिल्हा परिषदेचे कृषी व पशुसंवर्धन सभापती अजय कंकडालवार, आविसंचे ज्येष्ठ नेते मंदाशंकर, सिरोंचा तालुकाध्यक्ष बानय्या जनगम, पेंटिपाकाचे उपसरपंच कुमरी सडवली, व्यंकटापूरचे माजी उपसरपंच व्यंकटी करसपल्ली, सिरोंचाचे माजी उपसरपंच सल्लम रवीगोनगोनी, श्याम बेजन्नी, मारोती गागारपू आदी उपस्थित होते. धरणाचे बांधकाम सुरू झाल्यास आदिवासी विद्यार्थी संघाच्या नेतृत्वात तीव्र आंदोलन केले जाईल, असा इशारा निवेदनातून दिला आहे. (प्रतिनिधी)
मेडीगट्टा-कालेश्वर प्रकल्पाचे काम थांबवा
By admin | Updated: March 2, 2016 01:55 IST