चालक व वाहक सामान उतरवू लागले : प्रवाशांना अर्धा तास झाला उशीरआलापल्ली : हात दाखविल्यानंतरही एसटी महामंडळाची बस थांबत नाही, अशा तक्रारी नेहमीच होतात. मात्र शनिवारी उलटा प्रकार घडला. अहेरी आगाराची हैदराबादवरून येणारी बस आलापल्ली गावात दोन प्रवाशांचे भारदस्त सामान उतरविण्यासाठी वीर बाबुराव शेडमाके चौकात बराच वेळ थांबल्याचा प्रकार येथे घडला. चालक व वाहक दोघेही सामान उतरविण्यासाठी तत्परतेने सेवा देताना पाहून आलापल्लीकर थक्क होऊन गेले. हैदराबादवरून अहेरीसाठी येणारी बस एमएच-०६-एच-८०९३ मध्ये दोन प्रवाशी हैदराबादवरून भरगच्च सामान घेऊन आलापल्लीसाठी बसले. सकाळी आलापल्ली शहरात मुख्य मार्गावरील वीर बाबुराव शेडमाके चौकात बस आली. रस्त्याच्या मधोमध या दोन प्रवाशांना सोयीचे व्हावे म्हणून बस थांबविण्यात आले व त्यांचे सामान उतरविण्यासाठी स्वत: चालक व वाहक तत्परतेने काम करताना दिसून आले. या चौकातून पुढे काही अंतरावर आलापल्ली बसस्थानक आहे. परंतु तेथे बस नेण्यापूर्वी प्रवाशांना सोयीचे व्हावे, म्हणून बस मुख्य चौकात थांबविण्यात आली व तेथे स्वत: चालक-वाहक सामान उतरवू लागले. त्यामुळे तब्बल अर्धा तास बस येथे थांबून होती. अर्धा तास उशिराने ती बस अहेरी आगारात पोहोचली. राज्य परिवहन महामंडळाच्या कर्मचाऱ्यांचा हा कार्यक्रम पाहून अनेकांना आश्चर्य वाटले. साधारणत: हात दाखविल्यानंतरही बस थांबविली जात नाही. असे अनेकदा होत असताना शुक्रवारच्या या प्रकाराने बसमधील इतर प्रवाशांना मनस्ताप तर झालाच परंतु एसटी अधिक सामान घेऊन येणाऱ्या या आलापल्लीच्या दोन प्रवाशांवर एवढी मेहरबान का झाली, हा विषय मात्र सर्वत्र चर्चेचा होता. अहेरी आगाराच्या अनेक बसगाड्या आंतरराज्यीय सेवा देणाऱ्या आहेत. तसेच राज्याच्या इतर आगारातही येथून मोठ्या प्रमाणावर बसगाड्या जातात. त्यांच्याविषयी अनेक समस्या व तक्रारी प्रवाशांना आहे. या पार्श्वभूमीवर आजची घटना अधिकच वेगळी आहे.
मुख्य चौकातच थांबली एसटी
By admin | Updated: October 11, 2015 02:32 IST