गडचिरोली : शासकीय इमारतीचे बांधकाम करणारे लिजधारक व विविध प्रशासकीय विभागाकडून परवान्यापोटी गडचिरोलीच्या जिल्हा खनिकर्म विभागाला सन २०१५-१६ या आर्थिक वर्षात एकूण १९ कोटी ७१ लाख ११ हजार १२९ रूपयांचा महसूल प्राप्त झाला आहे. जिल्ह्यात दरवर्षी अनेक शासकीय इमारतीचे बांधकाम खासगी कंत्राटदारांकडून करण्यात येते. या बांधकामावर वापरण्यात येणाऱ्या मुरूम, दगड, रेती, गिट्टी आदीसह इतर गौण खनिजाचा परवाना घेणे अत्यावश्यक आहे. यासाठी संबंधित कंत्राटदाराला जिल्हा महसूल विभागाकडे रॉयल्टी भरावी लागते. याशिवाय नगर परिषद, पंचायत समिती, ग्रामपंचायत आदी स्थानिक स्वराज्य संस्थांसह विविध प्रशासकीय विभागालासुध्दा परवानगी घ्यावी लागते. या दोन्ही कामाच्या माध्यमातून जिल्हा खनिकर्म विभागाला लाखो रूपयांचा महसूल मिळत असतात. सन २०१५-१६ या आर्थिक वर्षासाठी शासनाने जिल्हा खनिकर्म विभागाला गौण खनिज स्वामित्वधन महसूलबाबतचे एकूण २० कोटी रूपयांचे उद्दिष्ट दिले होते. खनिकर्म विभागाने वर्षभरात १९ कोटी ७१ लाखांचा महसूल प्राप्त केला. जिल्ह्यात एकूण सहा उपविभाग आहेत. सन २०१५-१६ या वर्षात गडचिरोली तालुक्यातून ६७२.६० लाखांचा महसूल मिळाला आहे. धानोरा १०२.२६ लाख, चामोर्शी १९२.२८ लाख, मुलचेरा ५३.६८ लाख, देसाईगंज २४५.९६ लाख, आरमोरी २७८.२९ लाख, कुरखेडा ६०९.५९ लाख, कोरची ३२.०७ लाख, अहेरी ४५.६४ लाख, सिरोंचा २०९.५२ लाख, एटापल्ली १२.४४ लाख व भामरागड तालुक्यातून ५.२९ लाखांचा महसूल मिळाला आहे. (स्थानिक प्रतिनिधी)कुरखेडा उपविभाग पिछाडीवरगौणखनिज स्वामित्वधन महसूलात सन २०१५-१६ या वर्षात कुरखेडा व कोरची या दोन तालुक्याचा समावेश असलेल्या कुरखेडा उपविभागाने केवळ ६७.९० लाख रूपयांचा महसूल प्राप्त केला असून याची टक्केवारी ५९.५ आहे. एटापल्ली उपविभागाने ५९.१४ टक्के, देसाईगंज उपविभागाने १२८.३४ टक्के, चामोर्शी उपविभागात ६४.७३ टक्के तर गडचिरोली उपविभागाने ९१.१४ टक्के महसूल प्राप्त केला आहे.अहेरी उपविभागातून सर्वाधिक महसूल : गडचिरोली जिल्ह्याच्या सहा उपविभागात अहेरी उपविभागातून सर्वाधिक २५५.१६ लाख रूपयांचा महसूल जिल्हा खनिकर्म विभागाला सन २०१५-१६ या वर्षात मिळाला असून याची टक्केवारी १७०.११ आहे. त्या खालोखाल गडचिरोली उपविभागातून ५७४.७२ लाख रूपयांचा महसूल मिळाला असून याची टक्केवारी ९१.१४ आहे. महसूल प्राप्तीत असलेल्या अहेरी उपविभागात अहेरी व सिरोंचा या दोन तालुक्यांचा समावेश आहे.
१९ कोटी ७१ लाखांचा महसूल
By admin | Updated: April 20, 2016 01:35 IST