जीवनावश्यक वस्तूंचे दर गगनाला
देसाईगंज : सध्या जीवनावश्यक वस्तूंसह इतर सर्वच वस्तूंचे दर गगनाला भिडले आहे. तेलाचे भाव तर मोठ्या प्रमाणात वाढले आहे. ७० ते ९० रुपयांना मिळणारे तेल पाकीट आता १२० ते १४५ रुपयांपर्यंत पोहोचले आहे. यामुळे सामान्य नागरिकांचे आर्थिक बजेट बिघडत आहे. अन्नदाता बळीराजाच्या शेतमालाला मात्र आजही भाव जैसे थे असल्याची स्थिती दिसून येत आहे. बळीराजा पुरता हतबल झालेला दिसत आहे. आता तर आणखी पेट्रोलच्या दरातही वाढ केली आहे. त्यामुळे सर्वसामान्य नागरिक त्रस्त झाले आहे.
ग्रामीण भागात विजेचा लपंडाव
अहेरी : सध्या ग्रामीण भागातील अनेक गावात विजेचा लपंडाव सुरू आहे. त्यामुळे नागरिकांना त्रास होत आहे. तसेच अहेरी तालुक्यातील अनेक गावांमध्ये विद्युत तारा लोंबकळल्या अवस्थेत आहेत. त्यामुळे थोडी हवा आली तरी विद्युत पुरवठा खंडित होतो.
प्रवासी निवाऱ्यांचा प्रस्ताव तयार
आरमाेरी : बहुतांश मोठ्या गावांमध्ये बस जाते. पण, बस थांब्यावर प्रवासी निवारे नसल्याने नागरिकांचे हाल होतात. विद्यार्थ्यांना ताटकळत राहावे लागते. त्यामुळे प्रस्ताव तयार करून निवारे बांधावे, अशी मागणी आहे.
निराधार प्रकरणांचा निपटारा करावा
आष्टी : संजय गांधी निराधार योजनेच्या लाभार्थ्यांची प्रकरणे तातडीने निकाली काढून जिल्ह्यातील लाभार्थ्यांना न्याय देण्याची मागणी लाभार्थ्यांनी केली आहे.
मोकळ्या जागेची स्वच्छता करा
अहेरी : अहेरी शहरात अंतर्गत स्वच्छता अभियान राबविले जात आहे, असे असले तरी शहरातील अनेक मोकळ्या जागेत व प्लाॅटमध्ये कचऱ्याचे साम्राज्य दिसून येते. हा कचरा प्लाॅटधारकांच्या खासगी जागेत असल्याने स्वच्छता कर्मचारी तो साफ करत नाही. त्यामुळे या ठिकाणी आणखी कचरा फेकला जातो. यामुळे घाणीचे साम्राज्य तयार होऊन शहर सौंदर्य बाधित करत आहे.
तालुका सीमा फलक नसल्याने संभ्रम
भामरागड : जिल्ह्यातील एकाही तालुक्याच्या सीमेवर तालुका सीमा स्वागत फलक नाही. त्यामुळे कोणता तालुका कुठून सुरू होतो, याबाबत नवीन व्यक्ती संभ्रमात पडतो आहे. या सीमांवर सीमा स्वागत फलक लावल्यास सीमाही सुशोभित दिसेल. तसेच या माध्यमातून शहरांच्या अंतराची माहितीही मिळेल. त्यामुळे बांधकाम विभागाने प्रत्येक तालुका सीमेवर सीमा स्वागत फलक लावावे, अशी मागणी नागरिकांनी केली आहे.
अनुदान रखडल्याने शेतकऱ्यांची कोंडी
धानाेरा : जिल्ह्यात सिंचन विहीर योजनेची काही कामे झाली आहेत. खोदकाम केलेल्या लाभार्थ्यांना तत्काळ काम सुरू करण्याचे आदेश देण्यात आले. मात्र, अनेकांना अनुदान मिळाले नाही.
बेरोजगारांना निधी उपलब्ध करावा
आष्टी : शासनातील विविध विभागांमध्ये नोकर भरतीवर बंदी आहे. त्यातच कोरोनाचे सावट असल्याने युवक स्वयंरोजगारासाठी प्रयत्न करीत आहेत़ मात्र, कर्ज मिळत नसल्याने व्यवसाय कसा उभारावा, हा प्रश्न निर्माण झाला़ आहे. कोरोनामुळे राज्य सरकारने निधीत मोठी कपात केली. त्यामुळे सुशिक्षित बेरोजगारांची अडचण वाढली आहे.
शहरात नव्या वस्त्यात रस्त्याची मागणी
कुरखेडा : शहराचा दिवसेंदिवस झपाट्याने विस्तार होत आहे. मात्र शहरातील अनेक नवीन वस्त्या आजही अनेक सोयी-सुविधांपासून वंचित आहे. यात प्रामुख्याने रस्त्याची समस्या मोठ्या प्रमाणात आहे. त्यामुळे या भागात रस्त्यांची निर्मिती करण्यात यावी, अशी मागणी परिसरातील नागरिकांकडून होत आहे.
राजुऱ्यातील निवाऱ्यांची रंगरंगोटी करावी
आलापल्ली : राजुरा तालुक्यातील प्रवासी निवारे मागील काही वर्षांपासून दुर्लक्षित आहे. त्यामुळे प्रवाशांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. त्यामुळे या प्रवासी निवाऱ्याची दुरुस्ती करण्याची मागणी परिसरातील नागरिकांनी केली आहे.
दुर्गम भागातील गावे आजही दुर्लक्षित
भामरागड : भामरागड तालुक्यातील गावांच्या विकासाकडे शासनाने दुर्लक्ष केले आहे. परिणाणी रस्ते, पाणी, वीज आदी सुविधांपासून ही गावे वंचित आहे. विशेष म्हणजे, आजही गावात एसटीसुद्धा पोहोचली नाही. त्यामुळे किमान सुविधा पुरविण्याची मागणी करण्यात आली आहे.
इंटरनेटअभावी शेकडो ग्राहक त्रस्त
काेरची : तालुक्यातील बहुतांश गावात इंटरनेट सेवा ढिम्म असल्याने नागरिकांना व्यवहार करताना अडचणीचा सामना करावा लागत आहे. विशेष म्हणजे, काही बँकांमध्येही हीच समस्या असल्यामुळे ग्राहकांना ताटकळत राहावे लागते. त्यामुळे इंटरनेट सेवा सुरळीत करावी, अशी मागणी आहे.
शिंगाडा उत्पादनासाठी हवे अर्थसाहाय्य
आरमाेरी : जिल्ह्यातील विविध तालुक्यात कार्यरत मत्स्यपालन सहकारी संस्थेचे सभासद विविध मालगुजारी तलावात मत्स्यपालन व सिंगाड्याचे उत्पादन घेतात. परंतु, या व्यवसायाकरिता पैशाच्या संकटांचा सामना करावा लागत आहे. मत्स्यपालन बिजाई व सिंगाडा लागवडीकरिता निधीची आवश्यकता आहे. त्यामुळे शासनाने अशा संस्थांना आर्थिक सहकार्य करावे, अशी मागणी मत्स्यपालन सहकारी संस्थांनी केली आहे.
रस्त्यावरील रेतीमुळे अपघाताची शक्यता
सिराेंचा : शहरातील बहुतांश रस्त्यावर रेती साचली असल्यामुळे अपघाताची शक्यता आहे. त्यामुळे रेती उचलून रस्ते मोकळे करण्याची मागणी केली जात आहे.
अनेक कार्यालयांमधील बायोमेट्रिक नावापुरतेच
कोरची : शासकीय कार्यालयात कर्मचारी, अधिकारी नियमित वेळी उपस्थित राहावेत, याकरिता अनेक कार्यालयांमध्ये बायोमेट्रिक मशीन बसविण्यात आलेल्या आहेत. मात्र, काळाच्या ओघात अनेक कार्यालयांतील मशीन बंद आहेत. कर्मचाऱ्यांचे फावले आहे.