राष्ट्रीय आरोग्य धोरण २०१७ मधील शिफारशीनुसार शाश्वत विकास ध्येयामध्ये नमूद आरोग्य सेवा पुरवण्याचे ध्येय प्राप्त करण्याकरिता नागरिकांना वैश्विक आरोग्य कवच पुरविण्याच्या उद्देशाने केंद्र सरकारची महत्त्वाकांक्षी याेजना म्हणून आयुष्यमान भारत ओळखली जाते. ही योजना आरोग्य आणि कल्याण केंद्र व प्रधानमंत्री जनआरोग्य योजना या दोन परस्पर संबंधित योजनांचे एकत्रित स्वरूप आहे. प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेचा प्रारंभ २३ सप्टेंबर २०१८ रोजी पंतप्रधानांच्या हस्ते झाला. शासनाने माेठा गाजावाजा करून ही याेजना सुरू केली असली, तरी अद्यापही ही योजना तळागाळातील पात्र; परंतु वंचित घटकापर्यंत अद्यापही पाेहाेचली नाही. नक्षलग्रस्त दुर्गम भागात या याेजनेची प्रभावी अंमलबजावणी झाली नाही. लाहेरी भागातील अनेक नागरिक शासकीय याेजनांच्या लाभापासून वंचित हाेते. त्यांना याेजनांचा लाभ मिळावा, यासाठी उपपाेलीस स्टेशनचे प्रभारी अधिकारी अविनाश नळेगावकर यांनी वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली ‘पोलीसदादा लोरा खिडकी’ योजना सुरू केली. या माध्यमातून लाहेरी उप-पाेलीस ठाण्यात आयुष्यमान भारत योजनेच्या लाभार्थ्यांची नोंदणी सुरू केली. सामान्य सेवा केंद्र संचालक महेंद्र कोठारे यांचे यासाठी सहकार्य लाभले. परिसरातील ६६८ लाभार्थ्यांची नोंदणी करण्यात आली. यामुळे परिसरातील नागरिकांना घरपोच सेवा मिळाली आहे. शिबिराच्या यशस्वीतेसाठी पाेलीस उप-निरीक्षक महादेव भालेराव, अजय राठोड, विजय सपकळ, पाेलीस हवालदार व पाेलीस कर्मचाऱ्यांनी सहकार्य केले.
बाॅक्स
प्रती कुटुंब पाच लाखांपर्यंतचा विमा
आयुष्यमान भारत ही जगातील सर्वात मोठी शासकीय आरोग्य हमी योजना असून, प्रतिवर्ष प्रति कुटुंब पाच लाख रुपयांपर्यंतचा द्वितीय आणि तृतीय स्तरावरील उपचार या अंतर्गत मोफत केला जाताे. सामाजिक, आर्थिक, जातीय जनगणना २०११ नुसार पात्र, तसेच यात समाविष्ट नसलेले; परंतु २००८ राेजी सुरू केलेल्या राष्ट्रीय स्वास्थ्य विमा योजनेमध्ये समाविष्ट लाभार्थीही यात पात्र आहेत. लाहेरी येथे अनेक वंचित नागरिकांनी नाेंदणी केली असल्याने त्यांना आराेग्य समस्या उद्भवल्या. उपचार घेण्यासाठी याेजना फायदेशिर ठरणार आहे.