लाेकमत न्यूज नेटवर्कगडचिराेली : जिल्हा महिला व बाल रुग्णालयाच्या खाटांची क्षमता १०० एवढी असताना या रुग्णालयात सद्य:स्थितीत जवळपास २५० रुग्ण भरती आहेत. अनेकांना खाली गादीवर झाेपून उपचार घ्यावे लागत आहेत. जिल्हा सामान्य रुग्णालयावर पडणारा रुग्णांचा भार लक्षात घेरून गडचिराेली येथे स्वतंत्र महिला व बाल रुग्णालयाची निर्मिती करण्यात आली. या रुग्णालयात गराेदर माता, लहान बालके यांच्यावर उपचार केले जातात. या रुग्णालयाची क्षमता १०० खाटांची आहे. मात्र, या रुग्णालयावर गडचिराेली जिल्ह्यासह चंद्रपूर, गाेंदिया, भंडारा व नजीकच्या छत्तीसगड राज्यातीलही रुग्णांचा भार वाढत चालला आहे. उपकेंद्र, प्राथमिक आराेग्य केंद्र, ग्रामीण रुग्णालय व उपजिल्हा रुग्णालयात प्रसूतीची सुविधा उपलब्ध आहे. गुंतागुतीची प्रसूती असल्यावरच संबंधित महिलेला जिल्हा रुग्णालयात पाठविणे अपेक्षित आहे. मात्र, काेणतीही गुंतागुंत नसलेल्या अनेक गराेदर मातांना थेट महिला व बाल रुग्णालयात रेफर करण्याचे प्रमाण वाढत चालले आहे. त्यामुळे या रुग्णालयावर भार वाढत चालला आहे. बेड उपलब्ध नसल्यास गादी टाकून झाेपण्याची व्यवस्था केली जाते. मात्र, उपचारांचे काय, असा प्रश्न निर्माण हाेतो. १०० भरतीच्या रुग्णांवर उपचार करू शकतील, एवढेच मनुष्यबळ उपलब्ध आहे. त्यात आता अडीचपटींनी रुग्णांमध्ये वाढ झाल्याने कार्यरत डाॅक्टर व आराेग्य कर्मचाऱ्यांवरील कामाचा ताण वाढत चालला आहे. रूग्णासाेबतच नातेवाईकांनाही राहावे लागते. गडचिराेलीत अनेक दिवस स्वयंपाक करून जीवन जगावे लागते.
दरराेज ३० महिलांची प्रसूतीग्रामीण भागातून अनेक गराेदर महिलांना थेट महिला व बाल रुग्णालयात पाठविले जाते. दर दिवशी या ठिकाणी ३० महिलांची प्रसूती केली जाते. प्रसूतिपूर्व व प्रसूतिपश्चात हे दाेन्ही वाॅर्ड फुल भरून आहेत. अनेकांना जागा नसल्याने जमिनीवर गादी टाकून उपचार घ्यावे लागत आहेत.
५० नवजात शिशू भरती- कमी दिवसांत जन्माला आलेले, वजन कमी असलेले, जन्मजात व्यंग असलेल्या बालकांना भरती करण्यासाठी या रुग्णालयात २४ रुग्णांची क्षमता आहे. मात्र, सद्य:स्थितीत या ठिकाणी सुमारे ५० बालके उपचार घेत आहेत. २९ दिवसांच्या पुढचे जवळपास ४५ बालके उपचार घेत आहेत. ३३ कुपाेषित बालकांवरही उपचार सुरू आहेत.
रेफर टू गडचिराेलीमुळे समस्या वाढलीगावपातळीवरील उपकेंद्र, प्राथमिक आराेग्य केंद्र, ग्रामीण रुग्णालय व उपजिल्हा रुग्णालयांमध्ये प्रसूतीची सुविधा उपलब्ध आहे. अतिशय गुंतागुतीची प्रसूती असेल तरच त्या महिलेला जिल्हास्तरावर पाठविणे अपेक्षित आहे. मात्र, उपकेंद्र, प्राथमिक आराेग्य केंद्र, ग्रामीण रुग्णालये येथील डाॅक्टर थेट महिला व बाल रुग्णालयात गराेदर महिलेला रेफर करतात. रेफर करण्याच्या प्रकारामुळे येथे गर्दी वाढत चालली.