गडचिरोली : जिल्ह्यात सलग तिसऱ्या दिवशी मंगळवारी अनेक भागात मेघगर्जनांसह पाऊस झाला. मंगळवारी गडचिरोली शहरातही सायंकाळी पाऊस सुरू झाला. देसाईगंज, भामरागड, कुरखेडा, आरमोरी शहरांनाही पावसाने चांगलेच झोडपले. आरमोरी शहरात विजांच्या कडकडाटासह जवळपास पाऊन तास पाऊस झाला. त्यामुळे शहरी व ग्रामीण भागातील वीज पुरवठा पूर्णत: ठप्प झाला. सखल भागात पावसाचे पाणी साचून होते. कुरखेडा येथेही सायंकाळी ६.०५ ते ७ वाजेपर्यंत मेघगर्जनासह पाऊस झाला. त्यामुळे शहरातील वीज पुरवठा खंडित झाला होता. देसाईगंज तालुक्यातही एक तासापासून वीज पुरवठा खंडित होता. रिमझिम पाऊस येथेही झाला. भामरागड तालुक्यात बोरमफूट मार्गावर वीज तारांवर झाड पडल्याने वीज पुरवठा बंद होता. मंगळवारी दुपारपर्यंत भामरागडचा वीज पुरवठा सुरळीत सुरू करण्यात आला. मात्र कोठी, आरेवाडा येथील वीज पुरवठा बंदच होता. भामरागड तालुक्यात सोमवारी सायंकाळी ५ ते ६ वाजताच्या सुमारास वादळीवाऱ्यासह जोरदार पाऊस झाला. बोटनफुंडी, ताडगाव तसेच आरेवाडा मार्गावर झाड तुटून पडल्याने वीज पोल तुटले व संपूर्ण आरेवाडा परिसर अंधारात आहे. मंगळवारी दुपारी १ वाजेपर्यंत बोटनफुंडी येथील ३३ केव्ही मेन लाईनवर पडलेले झाड हटवून भामरागडचा वीज पुरवठा पूर्ववत करण्यात आला. बुधवारपर्यंत संपूर्ण तालुक्याचा वीज पुरवठा पूर्ववत होईल, असा अंदाज आहे. नारगुंडा परिसरात २०० ग्रॅम एवढी मोठी गार पडली असून जंगलातील वनोपज, मोह आदीचे मोठे झाडे तुटून पडले आहेत. गावरानी आंबा, चिंच यांचे ढीग जंगलात या वादळामुळे पडल्याचे दिसून येत आहे. अनेक पशुपक्ष्यांनाही गारपिटीचा तडाखा बसला असून त्यांचा मृत्यू झाला आहे. जंगलात अनेक पशु व पक्षी मृत अवस्थेत पडून असल्याचे दिसून आले. आंब्याचा बहरही गारांमुळे पडला. त्यामुळे बाजारात आज कैऱ्या मोठ्या प्रमाणात विक्रीसाठी आल्या होत्या. पेरमिली परिसरात या पावसामुळे विजेचा लपंडाव सुरू असून महावितरणात रिक्तपदांचा फटका या परिसरातील गावांना बसत आहे. १३ गावांचा भार केवळ एका वीज हेल्परवर सोपविण्यात आला असून वीज पुरवठा सुरळीत होण्यास अडचणी निर्माण होत आहे.भामरागडात सर्वाधिक पाऊसजिल्ह्यात मंगळवारी धानोरात तालुक्यात १० मीमी, मुलचेरा तालुक्यात ६.४, कोरची २.८, एटापल्ली २०.२, भामरागड तालुक्यात ६३.२ मीमी पाऊस झाल्याची नोंद नियंत्रण कक्षाने केली आहे.
जिल्ह्यात पावसाने वीज पुरवठा खंडित
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 16, 2016 08:36 IST