अल्पवयीन चालकांवर कारवाई करा
आरमोरी : शहरातून मोठ्या प्रमाणात भरधाव वेगाने वाहने चालविली जात आहेत. मात्र, याकडे वाहतूक पोलिसांचे दुर्लक्ष होत आहे. यामुळे अपघातही वाढले असून, भरधाव वेगाने अल्पवयीन वाहनचालकांवर कारवाई करण्याची मागणी होत आहे.
शहरातील नाल्यांची दुरुस्ती करा
गडचिरोली : शहरात अनेक नाल्यांच्या बाजूला असलेल्या रस्त्यांची वारंवार दुरुस्ती झाल्याने रस्ते उंच आणि नाल्या खाली गेल्या आहेत. शिवाय शहरातील रस्ते अरुंद असल्याने अनेक वाहनेही नालीत पडून अपघात होण्याची शक्यता असते. या नाल्यांवर कोणतेच आच्छादन नसल्यानेही किरकोळ अपघात घडतात.
सिरोंचा तालुक्यातील बस थांब्याची दुरवस्था
सिरोंचा : अहेरी ते गडचिरोली आगारातून सिरोंचा तालुक्याच्या ग्रामीण भागात बस सोडल्या जातात. प्रवाशांच्या सोयीसाठी प्रवासी निवारे बांधण्यात आली आहेत. मात्र, प्रवासी निवाऱ्यांच्या देखभालीकडे दुर्लक्ष झाले असल्याने त्यांची प्रचंड दुरवस्था झाली आहे. बऱ्याच प्रवासी निवाऱ्यांची टिनपत्रे वादळाने उडाली आहेत. भिंती पिचकारीने रंगल्या असून, घाणीचे साम्राज्य पसरले आहे.
अहेरी शहरातील अतिक्रमण काढा
अहेरी : शहरात रस्त्याच्या दुतर्फा अतिक्रमण वाढले आहे. त्यामुळे रहदारीला अडथळा निर्माण होत आहे. प्रशासनाने सदर अतिक्रमण तात्काळ काढावे, अशी मागणी नागरिकांकडून केली जात आहे. यापूर्वीही अनेकदा मागणी करण्यात आली. मात्र, दुर्लक्षच झाले आहे. सातत्याने मागणी करूनही प्रशासनाकडून अतिक्रमणधारकांवर कारवाई होताना दिसून येत नाही.
अभयारण्यातील गावांचे पुनर्वसन रखडले
आष्टी : चामोर्शी तालुक्यातील आष्टी परिसरातील चपराळा अभयारण्याअंतर्गत चपराळा व इतर लहान-मोठी चार ते पाच गावे येतात. या अभयारण्यातील पशूंमुळे गावकऱ्यांना धोका आहे. आजपर्यंत वन्य पशूंचे अनेक हल्ले नागरिकांवर झाले आहेत. त्यामुळे या गावांचे पुनर्वसन करण्याची मागणी होत आहे.
ग्रामीण भागातील स्मशानभूमींची दुरवस्था
कुरखेडा : जि.प. प्रशासनामार्फत दहन व दफनभूमी बांधण्याची योजना गेल्या काही वर्षांपासून हाती घेण्यात आली असली तरी ग्रामीण भागातील अनेक गावांतील जुन्या स्मशानभूमीची दुरवस्था झाली आहे. काही ठिकाणचे दहनशेड मोडकळीस आले असून, स्मशानभूमीत जाण्यासाठी रस्तादेखील नाही. त्यामुळे अंत्यसंस्कारासाठी अनेक अडचणी येतात.
पुलाचे बांधकाम करण्याची मागणी
झिंगानूर : झिंगानूर ते सिरकोंडा या मुख्य रस्त्यावर मामिडी तोगू नाला आहे. या नाल्यावर पूल बांधण्यात यावा, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे. पूल नसल्याने पावसाळ्यात या मार्गावरील वाहतूक ठप्प राहते. त्यामुळे पुलाची निर्मिती होणे आवश्यक आहे.
भिवापूर-आमगाव मार्गाची दुर्दशा
चामोर्शी : तालुक्यातील भिवापूर क्रॉसिंग-आमगाव (महल)-नेताजीनगर हा १५ कि.मी.चा रस्ता पूर्णपणे उखडला आहे. डांबर निघून मोठमोठे खड्डे पडले आहेत. वाहनचालकांना या रस्त्यावरून वाहने चालविणे कठीण होत असल्याने सदर मार्गाची दुरुस्ती करण्यात यावी.
गावकऱ्यांचे हाल
चामोर्शी : तालुक्यातील अनेक गावांसाठी रस्त्याचे बांधकाम करण्यात आले नसल्याने नागरिकांना पायवाटेनेच ये-जा करावी लागत आहे. तालुक्यातील वेंगनूर येथे अद्यापही शासनाच्या योजना पोहोचलेल्या नाहीत. तळोधी मो., भेंडाळा, कान्होली, कमळगाव या भागांत पक्के रस्ते तयार केले नाहीत.
अतिक्रमण वाढले
गडचिरोली : गडचिरोली शहराच्या मध्यभागी असलेल्या सिंचाई विभागाच्या तलावात अतिक्रमण वाढले आहे. या अतिक्रमणाचा दिवसेंदिवस विस्तार होत आहे. यावर्षी तलावात पाणी कमी असल्याने आणखी जागा हडप करण्याचा प्रयत्न नागरिकांकडून चालविला जात आहे.
मोहली येथील मनोऱ्याची रेंज वाढवा
धानोरा : तालुक्यातील मोहली येथे बीएसएनएलचा मनोरा आहे; परंतु त्याची क्षमता कमी असल्याने दुर्गम परिसरातील ग्राहकांना याचा लाभ होत नाही. मोहली, दुधमाळा, गिरोला, गोडलवाहीत मनाेरे नाहीत.
शासकीय विहिरीवर खासगी पंपांचा कब्जा
धानाेरा : तालुक्यातील अनेक शासकीय विहिरींवर खासगी पाणीपंप लावण्यात आले आहेत. मात्र, याबाबत ग्रामीण भागातील नागरिक तक्रार करीत नाहीत. ग्रामपंचायतीने स्वत: दखल घेऊन अशा प्रकारच्या अवैध मोटार काढणे आवश्यक असतानाही दुर्लक्ष होत आहे.
परवानगी न घेताच घरांचे बांधकाम वाढले
गडचिराेली : नगर परिषद क्षेत्रात घराचे बांधकाम करायचे असेल तर नगर परिषदेकडून रीतसर परवानगी घ्यावी लागते. मात्र, शहरातील बहुतांश घरमालक नगर परिषदेकडे परवानगी न घेताच घरांचे बांधकाम करीत असल्याचे प्रकार उघडकीस आले आहेत. नगर परिषदेने कारवाई करण्याची गरज आहे.
सिरोंचातील थ्री-जी सेवा सुधारा
सिरोंचा : सिरोंचा येथे बीएसएनएलच्या वतीने थ्री-जी सेवा बसविण्यात आली आहे. मात्र, ही थ्री-जी सेवा केवळ नावापुरतीच असल्याचे दिसून येत आहे. या ठिकाणी बीएसएनएलचा इंटरनेट स्पीड टू-जी सेवेप्रमाणे दिली जात आहे. नागरिकांकडून थ्री-जी सेवेचे पैसे घेतले जात असून, सेवा मात्र टू-जी प्रमाणे दिली जात आहे.
कठड्यांअभावी वृक्षसंवर्धन धोक्यात
काेरची : तालुक्यातील बहुतांश ग्रामपंचायतींनी वृक्षारोपण केले आहे. मात्र, या वृक्षांचे जनावरांपासून संरक्षण करण्यासाठी कठडे बांधण्यात आले नाहीत. त्यामुळे लावलेले वृक्ष जनावरांचे खाद्य बनत चालले आहे. अर्ध्यापेक्षा अधिक वृक्ष नष्ट होण्याच्या मार्गावर आहेत. कठडे पुरविण्याची मागणी आहे.
पुलाअभावी वाहतूक होते वारंवार प्रभावित
कमलापूर : कमलापूर भागात अनेक गावांना जाताना नाले पडतात. मात्र, या नाल्यावर अद्यापही पुलाचे बांधकाम करण्यात न आल्याने वाहतूक प्रभावित हाेते.
घरांची दुरवस्था कायम
गडचिरोली : कॉम्प्लेक्स परिसरात जिल्हाधिकारी कार्यालयातील कर्मचारी व जिल्हा परिषदेच्या कर्मचाऱ्यांसाठी ५०० घरांची स्वतंत्र कॉलनी वसविण्यात आली आहे. या कॉलनीतील घरांची दुरवस्था झाली आहे. या घरांमध्ये राहणेही कठीण झाले आहे.
गंजलेल्या विद्युत खांबाने धोका
सिरोंचा : येथील अनेक वॉर्डांतील रस्त्यालगत असलेले विद्युत खांब गंजले आहेत. सदर खांब कोसळून अपघात होण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे हा खांब बदलण्याची मागणी होत आहे.
एटापल्ली तालुक्यातील सौरदिवे नादुरुस्त
एटापल्ली : अतिदुर्गम भागात असलेल्या एटापल्ली तालुक्यातील आदिवासी गावांत सौरदिवे लावण्यात आले; परंतु अनेक गावांत लावण्यात आलेले सौरदिवे नादुरुस्त आहेत. सौरदिव्यांच्या बॅटऱ्या चोरीला गेल्याने सौरदिवे बेकामी झाले आहेत.
पशुखाद्यांच्या किमतीत भरमसाठ वाढ
आलापल्ली : दुभत्या व कष्टाचे काम करणाऱ्या जनावरांना सरकी, ढेप, कडधान्यांचा कोंडा खायला दिला जातो. यामुळे जनावर सुदृढ राहून दूध जास्त देते. वाढत्या महागाईचा फटका पशुखाद्यांनाही बसला आहे. किमती १० टक्क्यांनी वाढल्या.
सिरोंचा तालुक्यातील रस्त्यांची दुरुस्ती करा
सिरोंचा : जिल्ह्यातील दुर्गम भागातील जवळपास ३०० गावांना अजूनही जाण्यासाठी रस्ते नाहीत. त्यामुळे या गावांतील नागरिकांना पायवाटेचाच आधार घ्यावा लागत आहे. शासनाची सडक योजना दुर्गम गावांपर्यंत अद्यापही पोहोचली नाही.
सुबाभूळ लागवडीसाठी अनुदान द्या
धानोरा : सुबाभूळ लागवडीकरिता शेतकऱ्यांना कृषी व वन विभागाने अनुदान द्यावे, अशी मागणी शेतकऱ्यांकडून होत आहे. यातून शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणावर आर्थिक लाभ होतो. त्यामुळे स्थानिक स्तरावरून शेतकऱ्यांना प्रशिक्षण देऊन अनुदान द्यावे, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे. शेतकऱ्यांसाठी ही बाब फायदेशीर राहणार आहे.
औद्योगिक वसाहतीला प्रोत्साहनाची गरज
धानोरा : छत्तीसगड सीमेला लागून असलेल्या धानोरा तालुका मुख्यालयात औद्योगिक वसाहत निर्माण करण्याचा निर्णय आघाडी सरकारने घेतला होता. मात्र, याबाबत अंमलबजावणी करण्यात आली नाही. त्यामुळे व्यावसायिकांना उद्योग टाकण्यास अडचणी येत आहेत.
कुरखेडातील गावांना लाइनमनच नाही
कुरखेडा : तालुक्यातील अनेक गावांत राइस मिल, आटा चक्की, सार्वजनिक नळ पाणीपुरवठा योजना व कृषिपंपांना विद्युतपुरवठा करावा लागतो; परंतु अनेक गावांत लाइनमन नसल्याने विद्युत पुरवठा सुरळीत करण्याकडे दुर्लक्ष होते, तसेच एकाकडे अनेक गावांचा प्रभार आहे.
आरोग्य उपकेंद्रांना इमारतीची प्रतीक्षा
गडचिरोली : उपकेंद्र गावातीलच एका लहानशा भाड्याच्या खोलीत चालविले जात आहे. इमारत नसल्याने प्रसूती कक्षाची सुविधा नाही. त्यामुळे लांब अंतरावर असलेल्या प्राथमिक आरोग्य केंद्रात गरोदर मातांना प्रसूतीसाठी न्यावे लागत आहे. आरोग्य उपकेंद्रासाठी स्वतंत्र इमारत बांधण्याची मागणी होत आहे.
कॅरिबॅग टाकणाऱ्यांवर कारवाई नाही
देसाईगंज : नगरपालिकेच्या क्षेत्रात व्यावसायिक व नागरिक मोठ्या प्रमाणावर काळ्या व पांढऱ्या कॅरिबॅग पिशव्यांचा वापर करतात. येथील राजेंद्र वॉर्ड, माता वॉर्ड व गांधी वॉर्डांतील अनेक जण दुकान बंद झाल्यानंतर या कॅरिबॅग व प्लास्टिक कागद रस्त्यावर व नाल्यांमध्ये फेकतात. नाल्यांमध्ये प्लास्टिक व कॅरिबॅग टाकले जात असल्याने सांडपाणी निचरा हाेण्याचा मार्ग बंद झाला आहे. कारवाईची नितांत गरज आहे.
रेपनपल्ली मार्गावरील पूल कालबाह्य
कमलापूर : कमलापूर ते रेपनपल्ली या तीन कि.मी.च्या रस्त्यावरील डांबर जागोजागी उखडले आहे. आतील दगड व गिट्टी बाहेर आली आहे, तसेच या रस्त्यावर असलेले पूलसुद्धा जीर्णावस्थेत आहेत. सदर पुलाची उंची कमी आहे. त्यामुळे या पुलावरून पावसाळ्यात पाणी वाहते. वेळोवेळी वाहतूक खंडित होत असल्याने नागरिक त्रस्त आहेत.