गडचिरोली : गडचिरोली जिल्ह्यात राबविण्यात येत असलेल्या जिल्हा कौशल्य विकास कार्यक्रमाला पंतप्रधान पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले. मंगळवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते दिल्ली येथे हा पुरस्कार प्रदान करण्यात आला. नागरी सेवा दिनाचे औचित्य साधून सांघिक श्रेणीतील पुरस्कार गडचिरोली जिल्ह्यात राबविण्यात येत असलेल्या जिल्हा कौशल्य विकास कार्यक्रमाला ्रप्रदान करण्यात आला. गडचिरोलीचे जिल्हाधिकारी रणजिकुमार, गडचिरोलीचे तत्कालीन जिल्हाधिकारी व नागपूरचे विद्यमान जिल्हाधिकारी अभिषेक कृष्णा, गडचिरोली वन विभागाचे मुख्य वनसंरक्षक टी. एस. के. रेड्डी, पी. बी. देशमाने, वाय. एस. शेंडे यांना हा पुरस्कार देण्यात आला. २०१२ पासून गडचिरोली जिल्ह्यात जिल्हा कौशल्य विकास कार्यक्रम राबविण्यात येत आहे. या अंतर्गत एक हजार ७०० युवकांना प्रशिक्षण देण्यात आले असून एक हजार ३०० युवक स्वबळावर उभे झाले आहे. गडचिरोलीचा हा प्रकल्प आता राज्यात राबविला जाणार आहे. पाच जिल्ह्यात प्रायोगिक तत्वावर याची सुरूवातही झाली आहे. (जिल्हा प्रतिनिधी)
गडचिरोलीच्या जिल्हा कौशल्य विकास कार्यक्रमास पंतप्रधान पुरस्कार
By admin | Updated: April 23, 2015 01:30 IST