विद्युत बचत सप्ताह : उपविभागीय कार्यालयाच्या वतीने चामोर्शीतचामोर्शी : विजेचा वापर वाढल्याने अन्यत्र ठिकाणी पुरवठा करण्यास महावितरणला अडचणी निर्माण होत आहेत. या अडचणींमुळे अनेकदा भारनियमन करण्याची वेळ येते. याचा फटका लोकांनाच सहन करावा लागतो. त्यामुळे वीज बचतीबाबत जनजागृती करण्याच्या हेतूने चामोर्शी शहरात महाराष्ट्र राज्य वीज वितरण उपविभागीय कार्यालयाच्या वतीने विद्युत बचत सप्ताहानिमित्त शनिवारी सकाळी १० वाजता शहरात जनजागृती रॅली काढण्यात आली. या रॅलीतून वीज बचतीचा संदेश शहरवासीयांना देण्यात आला.तहसील कार्यालय बायपास मार्गावर असलेल्या उपविभागीय कार्यालयातून रॅलीची सुरुवात करण्यात आली. त्यानंतर रॅली लक्ष्मीगेट, चवडेश्वरी माता मंदिर, राममंदिर, पोलीस स्टेशन, माता मंदिर, मुख्य बाजारपेठ मार्ग, आष्टी मार्गावरील सबस्टेशनमार्गे काढून नागरिकांमध्ये जनजागृती करण्यात आली. रॅलीत वीज वितरण कंपनीचे कर्मचारी मोठ्या संख्येने सहभागी झाले. हातात फलक घेऊन तसेच लाऊड स्पिकरच्या माध्यमातून संपूर्ण शहरात वीज बचतीबाबत जनजागृती करण्यात आली. यानंतर वीज बचतीबाबत मार्गदर्शनही करण्यात आले. विजेचा अनावश्यक वापर टाळावा, मोजक्याच स्वरूपात विजेचा वापर करावा, असे आवाहन उपकार्यकारी अभियंता डी. बी. कुंभरे यांनी केले यावेळी सहायक अभियंता एस. के. रणदिवे, एम. एम. रणदिवे, झेड. एस. अल्ली, एस. जे. महल्ले, एस. आर. मसादे, एन. एम. भोवरे, पी. पी. शेंडे, एम. डी. वाकडे व वीज वितरण कंपनीचे कर्मचारी सहभागी झाले होते. (शहर प्रतिनिधी)
रॅलीतून वीज बचतीचा संदेश
By admin | Updated: December 20, 2015 01:11 IST