एटापल्ली : स्थानिक पंचायत समितींतर्गत तोडसा व कसनसूर येथील प्राथमिक आरोग्य केंद्रातील रूग्णवाहिकेला चालकच नसल्याने गेल्या वर्षभरापासून या दोनही केंद्रातील रूग्णवाहिका धुळखात पडल्या आहे. यामुळे बाहेरगाववरून येणाऱ्या रूग्णांचे प्रचंड हाल होत आहे.जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागांतर्गत जिल्हाभरात एकूण ४५ आरोग्य केंद्र आहेत. या सर्व प्राथमिक आरोग्य केंद्रांना आरोग्य विभागाच्यावतीने रूग्णांकरीता रूग्णवाहिका पुरविण्यात आल्या आहेत. मात्र एटापल्ली तालुक्यातील तोडसा व कसनसूर येथे चालकांचे पद रिक्त असल्यामुळे या केंद्रातील रूग्णवाहिका निकामी झाल्या आहेत. राष्ट्रीय कुटुंब कल्याण शस्त्रक्रिया कार्यक्रम, जननी शिशू सुरक्षा कार्यक्रमांतर्गत अनेक रूग्ण या प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचारासाठी येतात. याशिवाय या भागात सध्या साथरोग व मलेरिया आजाराच्या रूग्णांमध्ये वाढ झाली आहे. मात्र रूग्णवाहिकेअभावी आरोग्य सेवा पुरविण्यास अडचण येत आहे. त्यामुळे वाहनचालकांची नियुक्ती करण्याची मागणी होत आहे. (तालुका प्रतिनिधी)
रूग्णवाहिकांना चालकच नाही
By admin | Updated: December 22, 2014 22:46 IST