गडचिरोली : राजीव गांधी जीवनदायी आरोग्य योजनेंतर्गत गडचिरोली जिल्ह्यातील सुमारे दोन हजार २०४ रुग्णांवर मोफत शस्त्रक्रिया करण्यात आली असून यावर शासनाचे पाच कोटी २८ लाख २१ हजार ९५ रूपये खर्च झाले आहेत. वाढत्या महागाईसोबत वैद्यकीय उपचारही अत्यंत महाग झाले आहेत. सर्वसामान्य व गरीब व्यक्तीला अनेक रोगांवर उपचार करणे आर्थिकदृष्ट्या शक्य होत नाही. त्यामुळे असे रुग्ण खासगी रुग्णालयात जाऊन उपचार करण्यापेक्षा घरीच वेदनामय जीवन जगणे पसंत करतात. शासनाने संपूर्ण राज्यात शासकीय रुग्णालय उभारली असली तरी या रुग्णालयांमध्ये रुग्णांची हेळसांड होत असल्याचे दिसून आले आहे. परिणामी गरीब नागरिक मोफत उपचार मिळत असला तरी शासकीय रुग्णालयातही उपचार घेण्यास तयार होत नाही. यापासून मार्ग काढण्यासाठी महाराष्ट्र शासनाने राजीव गांधी जीवनदायी आरोग्य योजना सुरू केली. सर्वप्रथम ही योजना गडचिरोली, अमरावती, नांदेड, सोलापूर, धुळे, रायगड, मुंबई, मुंबई उपनगर या आठ जिल्ह्यांमध्ये प्रायोगिक तत्त्वावर राबविण्यात आली. त्यानंतर दोन वर्षांपूर्वी या योजनेचा विस्तार संपूर्ण राज्यात करण्यात आला आहे. या योजनेंतर्गत राज्य शासनाने गरीब नागरिकांच्या नावाने विमा काढला असून या विम्याअंतर्गत नागरिकांवर शस्त्रक्रिया व उपचार केले जातात. विम्याची रक्कम शासनाकडून भरली जाते. या योजनेंतर्गत पिवळी शिधापत्रिका, अंत्योदय, अन्नपूर्णा व नारंगी शिधापत्रिका असलेल्या कुटुंबाला याचा लाभ दिल्या जातो. गडचिरोली जिल्ह्यात आरोग्य व्यवस्थेचे तीन तेरा वाजले आहेत. गावांमध्ये उपकेंद्र व ग्रामीण रुग्णालय असले तरी यामध्ये आरोग्य कर्मचारी व अधिकारी उपस्थित राहत नाही. अनेक रुग्णालयांमध्ये आवश्यक काही साहित्यांचा अभाव आहे. तर दुसरीकडे गरिबीमुळे नागरिक खासगी रुग्णालयात जाऊ शकत नाही. अशा परिस्थितीत रुग्णांचे मोठे हाल होत होते. मात्र राजीव गांधी जीवनदायी योजनेची स्थापना झाल्यानंतर प्रत्येक तालुकास्थळावर आरोग्य मित्रांची नेमणूक करण्यात आली आहे. हे आरोग्यमित्र सदर रुग्णाला योग्य सल्ला देत आहेत. त्यामुळे या योजनेचा लाभ घेणाऱ्यांची संख्या दिवसेंदिवस वाढतच चालली आहे. योजनेच्या सुरुवातीपासून सुमारे दोन हजार २०४ रुग्णांवर शस्त्रक्रिया करण्यात आली आहे. यावर पाच कोटी २८ लाख २१ हजार ९५ रूपये शासनाने खर्च केले आहेत. ज्या रुग्णांची नागपूरपर्यंत जाण्याची ऐपत नव्हती, अशा रुग्णांवर लाखों रूपये खर्च करण्यात आले आहेत. त्यामुळे या योजनेबद्दल गरीब नागरिकांनी समाधान व्यक्त केले आहे.नोंदणीकृत रुग्णालयांची संख्या वाढविण्याची मागणी राजीव गांधी जीवनदायी योजनेंतर्गत गडचिरोली जिल्ह्यात केवळ एकच जिल्हा सामान्य रुग्णालय आहे. त्यामुळे बहुतांश रुग्णांना इतर जिल्ह्यातील रुग्णालयांमध्ये पाठवावे लागते. ये-जा करण्याचा काही खर्च या योजनेंतर्गत केला जात असला तरी दुसऱ्या जिल्ह्यात उपचार घेणे त्रासदायकच आहे. गडचिरोली जिल्ह्यात आरमोरी, अहेरी व कुरखेडा येथे जिल्हा सामान्य रुग्णालय आहेत. ही रुग्णालये नोंदणीकृत झाली असती तर नागरिकांना अधिक सोपे झाले असते. याबाबत लोकप्रतिनिधींनी मागणी करण्याची गरज आहे. सिरोंचाच्या नागरिकाला २०० किलो मीटर अंतर कापून गडचिरोली येथे यावे लागते. त्यानंतर या ठिकाणावरून पुढे वर्धा किंवा नागपूर येथे जावे लागते. हे अत्यंत त्रासदायक असल्याने या तीन रुग्णालयांची नोंदणी होणे गरजेचे आहे. नोंदणीसाठी आवश्यक असलेल्या सोयीसुविधा तिनही उपजिल्हा रुग्णालयांमध्ये उपलब्ध आहेत. यांची नोंदणी झाल्यास रुग्णांना सोयीचे होणार आहे.