आॅनलाईन लोकमतकोरेगाव/चोप : घराचा आधारवड असलेल्या पित्याचा मृत्यू झाल्यानंतर साऱ्या कुटुंबीयांवर दु:खाचा डोंगर कोसळला. मात्र घरात पित्याचे प्रेत असताना दु:ख पचवून तिने दहावीच्या पेपरसाठी परीक्षा केंद्र गाठून इतिहासाचा पेपर सोडविला. हा प्रसंग सोमवारी कोरेगावात घडला. शीतल कुळमेथे असे त्या धैर्यवान विद्यार्थिनीचे नाव आहे.येथील किसान विद्यालयाची इयत्ता दहावीची विद्यार्थिनी असलेल्या शीतलचे वडील श्यामराव कुळमेथे यांचे सोमवारी निधन झाले. त्यांच्यावर अंतिम संस्कार होण्याआधीच शितलच्या इतिहासाच्या पेपरची वेळ जवळ आली. एक पेपर चुकला तरी वर्ष वाया जाण्याची भिती. या प्रसंगाची माहिती कळताच शाळेचे प्राचार्य एस.जी. दहिवले यांनी शीतलचे घर गाठले आणि तिची समजूत घालत पेपरसाठी तयार केले. बहिणीनेही तिला धीर दिला. त्यानंतर शीतलने परीक्षा केंद्रावर पोहोचून इतिहासाचा पेपर सोडविला.पित्याचे प्रेत घरी असताना दु:खाचे घोट गिळत शीतलने दाखविलेले हे धैर्य चर्चेचा विषय ठरला. शितलचे वडिल मोलमजुरीचे काम करून घर सांभाळत होते. तिची बहिणही या कामात आधार देत होती. शीतलने शिक्षण घेऊन मोठे व्हावे हे घरच्या मंडळींचे स्वप्न असल्यामुळे तिच्यादृष्टीने दहावीची परीक्षा महत्वाची होती. पण घरातील कर्ता पुरूष आणि आधारस्तंभ गेल्यानंतर होणारे दु:ख एवढ्या लवकर पचवणे सहज शक्य नव्हते. मात्र शीतलने हिंमत दाखविल्याने तिचे वर्ष वाया जाण्यापासून वाचणार आहे.
पित्याच्या मृत्यूचे दु:ख पचवून शीतलने सोडविला पेपर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 19, 2018 23:36 IST
घराचा आधारवड असलेल्या पित्याचा मृत्यू झाल्यानंतर साऱ्या कुटुंबीयांवर दु:खाचा डोंगर कोसळला. मात्र घरात पित्याचे प्रेत असताना दु:ख पचवून तिने दहावीच्या पेपरसाठी परीक्षा केंद्र गाठून इतिहासाचा पेपर सोडविला.
पित्याच्या मृत्यूचे दु:ख पचवून शीतलने सोडविला पेपर
ठळक मुद्देप्राचार्य व बहिणीने दिला धीर : अंतिम संस्कारापूर्वी पेपरसाठी पोहोचली परीक्षा केंद्रावर