गोपाल लाजूरकर गडचिरोलीलोकमत दिन विशेषभारतीय साहित्यात मराठी साहित्याला आपल्या लेखनीने वैभव प्राप्त करून देणाऱ्या तसेच मराठी साहित्याला आपल्या प्रतिभेने फुलविणाऱ्या विष्णू वामन शिरवाडकर ऊर्फ कुसुमाग्रज यांचा जन्मदिवस २७ फेब्रुवारी ‘मराठी राजभाषा दिन’ म्हणून महाराष्ट्रात साजरा केला जातो. वि. वा. शिरवाडकर हे महाराष्ट्राला तात्यासाहेब या नावानेही परिचित आहेत. मराठी साहित्याला दिशा व स्थैर्यदशा त्यांच्याच पाच ते सहा दशकांच्या कार्यकाळात प्राप्त झाली. त्यामुळेच मराठी साहित्यातील कुसुमाग्रजांचे स्थान अग्रणी आहे. त्यांच्या जन्मदिनानिमित्त राजभाषा दिनाच्या रूपाने विविध साहित्य मंडळांमार्फत महाराष्ट्रात विविध कार्यक्रम साजरे केले जातात. गडचिरोली जिल्ह्यात दहाहून अधिक भाषा बोलणारे लोक वास्तव्यास आहेत. परंतु येथील प्राथमिक शिक्षण बहुधा मराठी, चामोर्शी तालुक्यात निवडक ठिकाणी बंगाली, देसाईगंज तालुका मुख्यालयात एकमेव उर्दू भाषिक शाळा आहे. छत्तीसगड सीमेलगतच्या भागातही मराठी माध्यमातूनच शिक्षण दिले जाते. त्यामुळे येथील प्राथमिक व महाविद्यालयीन शिक्षणावर मराठीचाच प्रभाव अधिक आहे. परिणामी इतर भाषांना वाव मिळण्यास कठिणताही अनेकदा आली आहे. तेलंगणा सीमेलगतच्या भागात तेलगू भाषिक बहुसंख्येने आहेत. मात्र या भागात शिक्षण मराठीतूनच दिले जात असल्याने येथील स्थानिकांना अध्ययनात विविध समस्या जाणवतात. परिणामी विद्यार्थी स्वयंअध्ययन करु शकत नाही. जिल्ह्याच्या सीमावर्ती भागातील लोकांना भाषेची अडचण जाणवत असल्याने कुठल्या भाषेतून पाल्यांना शिक्षण द्यावे, असा प्रश्नही त्यांना पडतो. त्यामुळेच या भागातील लोकांना मराठी व सीमावर्ती भागाचा अधिक प्रभाव असणाऱ्या भाषेचेही संवर्धन करावे लागते. मराठी भाषेत विविध भाषांची रसमिसळ होत असल्याने गावपातळीवरील भाषा लुप्त होत आहे. त्यामुळे मराठी भाषेची व्याप्ती वाढविण्याकरिता गावपातळीवरील शब्दांचा समावेश मराठी भाषेत होणे गरजेचे आहे. त्यामुळेच मराठीची व्याप्ती व मर्यादाही वाढेल.
राजभाषा सर्वदा स्वीकार्य होवो!
By admin | Updated: February 27, 2015 01:21 IST