ऑनलाईन लोकमतदेसाईगंज : मानवाच्या निर्मितीत जातीयवादाला कुठेही थारा नसताना व्यवसायाच्या आधारावर जातीय व्यवस्था निर्माण करुन बहुजनांना भावनेचे गुलाम बनवून आपल्या ईशाऱ्यावर नाचण्यास भाग पाडून त्यांना सामाजिक, नैतिक आणि आर्थिक हक्कांपासून वंचित ठेवण्याचे षडयंत्र रचल्या जात आहे. हे षडयंत्र बहुजन समाजाच्या प्रगतीसाठी बाधक असल्याने जातीय विषमता मोडीत काढण्यासाठी संघटित होणे काळाची गरज असल्याचे प्रतिपादन विचारवंत नागेश चौधरी यांनी केले.देसाईगंज येथील हटवार मंगल कार्यालयात कुणबी-ओबीसी मार्गदर्शन मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. याप्रसंगी नागेश चौधरी बोलत होते. मेळाव्याला देसाईगंज न.प.च्या नगराध्यक्षा शालू दंडवते, ब्रह्मपुरीच्या सहायक पोलीस निरीक्षक देवयानी पारधी नाकतोडे, वैज्ञानिक पंकज रामजी धोटे, प्रा. दामू शिंगाडे आदी मान्यवर प्रामुख्याने उपस्थित होते.मार्गदर्शन करताना चौधरी पुढे म्हणाले की, या देशातील बहुजन समाज कष्टकरी, कामगार वर्गात विखुरल्या गेला आहे. या वर्गातील बहुसंख्य नागरिक व त्यांची पाल्ये शिकुच नयेत, अशीच व्यवस्था करण्यात आली आहे. मंडल आयोग, स्वामीनाथन आयोगाच्या शिफारशी लागू करण्यास जाणूनबुजून दुर्लक्ष केले जात आहे. या देशातील बहुजन समाजाला जागृतीच्या प्रवाहात येऊच नये यासाठी विरोधी संघटना सक्रिय आहेत. त्यांच्या संघटित षडयंत्रामुळेच देशातील असंख्य शेतकऱ्यांनी आत्महत्या केली असल्याचे भयाणक वास्तव आहे. तरीही बहुजन समाज मानवतेच्या आधारावर संघटित न होता जातियवादाच्या राजकारणात विखुरल्या जात आहे, ही बहुजन समाजासाठी धोक्याची घंटा असुन नोकरी मिळते म्हणून शिकु नका तर न्याय हक्काने अधिकार मिळवण्यासाठी शिक्षणाची कास धरा. समाजात पर्यायाने देशात समतेवर आधारित व्यवस्था निर्माण करण्यासाठी जातीय विषमता मोडीत काढून मानवतेच्या आधारावर लढा उभा करणे काळाची गरज असल्याचे त्यांनी सांगितले.कार्यक्रमाचे संचालन प्रदीप तुपट, प्रास्ताविक नरेश चौधरी, आभार दिलीप नाकाडे यांनी मानले.
जातीय विषमता मोडीत काढणे काळाची गरज
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 25, 2018 23:49 IST
ऑनलाईन लोकमतदेसाईगंज : मानवाच्या निर्मितीत जातीयवादाला कुठेही थारा नसताना व्यवसायाच्या आधारावर जातीय व्यवस्था निर्माण करुन बहुजनांना भावनेचे गुलाम बनवून आपल्या ईशाऱ्यावर नाचण्यास भाग पाडून त्यांना सामाजिक, नैतिक आणि आर्थिक हक्कांपासून वंचित ठेवण्याचे षडयंत्र रचल्या जात आहे. हे षडयंत्र बहुजन समाजाच्या प्रगतीसाठी बाधक असल्याने जातीय विषमता मोडीत काढण्यासाठी संघटित होणे काळाची ...
जातीय विषमता मोडीत काढणे काळाची गरज
ठळक मुद्देनागेश चौधरी यांचे प्रतिपादन : देसाईगंजात कुणबी समाजाचा मेळावा