रस्त्यांची दुरवस्था : नाली बांधकाम रखडले; पथदिवेही बंदमहेश आगुला अंकिसायेथील रस्त्यांची मागील अनेक वर्षांपासून दुरूस्ती करण्यात आली नाही. त्यामुळे रस्त्यावर ठिकठिकाणी खड्डे पडले असून याकडे ग्रामपंचायत प्रशासनाचे दुर्लक्ष होत आहे. याचा त्रास गावकऱ्यांना सहन करावा लागत असल्याने ग्रामपंचायतीने नाली उपसा, मार्ग दुरूस्ती, पथदिवे लावणे आदी कामांना प्राधान्य द्यावे, अशी मागणी आहे. अंकिसा हे परिसरातील सर्वात मोठे गाव आहे. या ठिकाणच्या रस्त्यावर आठवडी बाजार भरत असून लक्ष्मीदेवीपेठा, बालमृत्यमपल्ली, गर्रेपल्ली, सोमनूर, सोमनपल्ली, जंगलपल्ली, आसरअल्ली, गुमलकोंडा आदी गावांमधील नागरिक आठवडी बाजारासाठी येतात. त्यामुळे अंकिसा येथे नेहमीच वाहनांची वर्दळ राहते. मात्र ग्रामपंचायतीने रस्त्यांच्या दुरूस्तीकडे दुर्लक्ष केल्याने रस्त्यांची अवस्था बकाल झाली आहे. एक महिन्यापूर्वी सरपंच व तंटामुक्त समिती अध्यक्ष धर्मया कोठारी यांनी पुढाकार घेऊन जेसीबीच्या सहाय्याने खड्डे खोदले. मात्र या खड्ड्यांमधील माती बाहेर न फेकल्यामुळे सदर माती त्याच ठिकाणी पडून आहे. जनावरांमुळे सदर माती पुन्हा खड्ड्यांमध्येच पडत असून खड्डे बुजण्यास सुरुवात झाली आहे. अंकिसा येथील प्रत्येक वॉर्डामध्ये सहा ते सात पथदिव्यांचे खांब लावण्यात आले आहेत. यातील अर्ध्याअधिक खांबांवरील पथदिवे मागील दोन ते तीन महिन्यांपासून बंद आहेत. पथदिवा बिघडल्यानंतर त्या ठिकाणी पाच ते सहा महिन्यांशिवाय नवीन पथदिवा लावल्या जात नाही. वर्षातील आठ महिने गावात अंधार राहत असल्याने दिवाबत्तीकर आपण का म्हणून भरावा, असा प्रश्न नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे. यानंतर ग्रामपंचायतीने पथदिवे न लावल्यास दिवाबत्ती कर भरणार नाही, असा इशारा दिला आहे. ग्रामपंचायतीला प्राप्त झालेल्या उत्पन्नातून पथदिवे, साफसफाई करणे सहज शक्य आहे. मात्र सरपंच, उपसरपंच, सचिव यांच्यासह ग्रामपंचायत सदस्य व पदाधिकाऱ्यांची याकडे दुर्लक्ष होत आहे.
अंकिसात समस्यांचा डोंगर
By admin | Updated: January 15, 2016 02:13 IST