देसाईगंज पं. स. ची आमसभा : काम होत नसेल तर माझ्याकडे तक्रार करादेसाईगंज : स्थानिक पं.स. सभागृहात शुक्रवारी पार पडलेल्या वार्षिक आमसभेत आमदार क्रिष्णा गजबे यांनी विविध कार्यालयातील अधिकाऱ्यांना दप्तर दिरंगाईबाबत चांगलेच खडसावले. सर्वसामान्यांच्या विकासासाठी सरकार आग्रही असून कोणताही अधिकारी या विकास कामात अडचणी आणत असेल तर त्याची थेट तक्रार माझ्याकडे करा, असे आवाहन क्रिष्णा गजबे यांनी सरपंच व उपस्थित नागरिकांना केले. बैठकीला पं. स. च्या सभापती प्रीती शंभरकर, उपसभापती नितीन राऊत, उपविभागीय अधिकारी दामोधर नान्हे, तहसीलदार अजय चरडे, संवर्ग विकास अधिकारी संगीता भांगरे, सहायक संवर्ग विकास अधिकारी सुनीता मरस्कोल्हे, पं. स. सदस्य परसराम टिकले, शिवाजी राऊत, जासुंदा मडावी, जि. प. सदस्य पल्लवी लाडे, रेखा मडावी, भाजपचे तालुकाध्यक्ष राजू जेठाणी आदी उपस्थित होते. संपूर्ण तालुक्यात मागील दीड वर्षांपासून कृषी विभागाकडून कोणत्याही प्रकाराची कामे करण्यात आलेली नाहीत. कामे प्रस्तावित असताना देखील कृषी विभागाकडून सकारात्मक पाऊल उचलले जात नाही, अशी तक्रार आमदारांकडे उपस्थितांनी केली. यावेळी कृषी विभागाचे तालुका अधिकारी कामाचे निमित्त सांगून प्रतिनिधीला बैठकीला पाठविल्याने वातावरण चांगलेच तापले. आ. क्रिष्णा गजबे यांनी विकास कामात जे अधिकारी अडसर निर्माण करीत असतील. तर त्यांच्या तक्रारी माझ्याकडे करा, अशा सूचना गजबे यांनी केल्या. तालुक्यातील शिक्षण विभागाने २०११ साली कॉन्व्हेंटच्या फी बद्दलची माहिती मागितली होती. मात्र त्या माहितीत कारमेल अकॅडमी आमगाव येथील माहिती देण्यात आली नव्हती. या मुद्यावरून गट शिक्षणाधिकाऱ्यांना तत्काळ माहिती मागण्यांच्या सूचना आमदारांनी दिल्या. ग्रामपंचायतीने कोणत्याही कामाचा प्रस्ताव सादर करताना सतत पाठपुरावा करणे आवश्यक आहे. तेव्हाच विकास साधता येईल, असेही आ. क्रिष्णा गजबे म्हणाले. कोरेगाव येथील पाणी पुरवठा उपयोजनेची विहीर कोरडी पडली आहे. त्यामुळे गावात दुष्काळसदृश्य परिस्थिती निर्माण झाली असून गाढवी नदीला धरणाचे पाणी सोडण्यात यावे, त्यातून मार्ग निघेल, अशी विनंती नागरिकांनी आमदारांना केली.आमगाव येथे पाणी पुरवठा १९८० मध्ये उभारण्यात आलेली आहे. गावात नवीन योजना कार्यान्वित करण्यात यावी, अशी मागणी या बैठकीत करण्यात आली. विविध कार्यालय प्रमुखांनी आपल्या विभागांची कामे सकारात्मक दृिष्टकोन ठेवून मार्गी लावावीत, अशा सूचना आमदारांनी केल्यात. (वार्ताहर)
आमदारांनी अधिकाऱ्यांना खडसावले
By admin | Updated: March 5, 2016 01:28 IST