याबाबत बालविकास प्रकल्प अधिकारी निर्मला कुचीक यांच्यामार्फत शासनाला निवेदन पाठविण्यात आले. ही मागणी मान्य न झाल्यास सन २०१९ मध्ये दिलेले मोबाईल सर्व अंगणवाडी सेविका येत्या जुलै महिन्यात शासनास परत करणार असा इशारा निवेदनातून देण्यात आला.
देसाईगंज तालुक्यात जि. प. च्या एकूण ८८ अंगणवाडी केंद्र आहेत. प्रती केंद्र एक या प्रमाणात शासनाने स्मार्टफोन वितरित केले. तेव्हापासून अंगणवाडी केंद्राशी संबंधित सर्व कामे ऑनलाईन सुरू होते. यासाठी कॅमशिअर नावाचे ॲप शासनाने विकसित केले होते. यात प्रत्येक माहिती मराठीत होती. त्यामुळे या ॲपमध्ये माहिती भरणे फारसे अडचणीचे वाटत नव्हते. त्यामुळे सर्व माहिती रोजच्या रोज ऑनलाईन केल्या जात होती. परंतु सुरू वर्षाच्या एप्रिल महिन्यापासून पोषण ट्रॅकर या ॲपमध्ये माहिती भरण्याची सक्ती करण्यात आली. हा ॲप इंग्रजीमध्ये आहे. त्यामुळे येथील काही शब्द व वाक्य समजत नाही. म्हणून माहिती भरण्यास अडचणी निर्माण होत आहेत. यात माहिती भरताना इतरांकडून प्रथमतः ते समजून घ्यावे लागते त्यामुळे वेळेवर माहिती जात नाही. याकरिता विलंब होतो. ज्या अंगणवाडी सेविकांची माहिती विहित मुदतीत अपलाेड होणार नाही, त्यांचे मानधन कपात करण्याचे आदेश शासनस्तरावरून धडकले आहेत. हा आमच्यावर अन्याय आहे. ग्रामीण भागात नेटवर्कची समस्या आहे, कधी कधी सर्व्हर काम करीत नाही. कधी दिवसभर विद्युत राहत नाही त्यामुळे मोबाईल चार्च होऊ शकत नाही. अशा अनेक समस्या ऑनलाईन करताना भेडसावत असतात. या अडचणी शासनास माहीत नाहीत काय, असा प्रश्न निवेदनातून केला आहे. निवेदन देताना तालुक्यातील अंगणवाडी सेविका राधा ठाकरे, मीनाक्षी झोडे, मीना बांगरे, अश्विनी बुल्ले, रंजना चंदनबाटवे, शीतल तुमराम, कोमल सहारे आदी हजर हाेते.
बाॅक्स :
तर ॲपमध्ये माहिती भरणार नाही
एकीकडे संपूर्ण कार्यालयीन कामे मराठीतून करण्याचे आदेश असताना ॲपमध्ये इंग्रजीतून माहिती भरण्याचे फर्मान काढणे म्हणजे आपलाच आदेशाला वाटाण्याच्या अक्षदा लावण्याचा प्रकार आहे. जोपर्यंत या सर्व अडचणी सोडविणार नाही, तोपर्यंत अंगणवाडी सेविका बाकीचे सर्व कर्तव्य पार पाडतील; परंतु पोषण ट्रॅकर ॲपमध्ये माहिती भरण्याचे काम करणार नसल्याचे निवेदनात म्हटले आहे.