गडचिरोली : शालेय जीवनात विद्यार्थी भविष्य घडविण्याची स्वप्न पाहतात. परंतु ते वास्तविकेत उतरविण्यात मोजकेच यशस्वी ठरतात. शालांत परीक्षेनंतर करिअर घडविण्याकरिता विद्यार्थ्यांमध्ये अंतर्मनाची जिद्द आवश्यक आहे. ती जिद्द निर्माण झाली तरच व्यक्ती जीवनात यशस्वी होऊ शकते, असे मार्गदर्शन राष्ट्रीय वक्ता जगदिश अग्रवाल यांनी शनिवारी केले. लोकमत बाल विकास मंच व युवा नेक्स्ट यांच्या वतीने शालेय विद्यार्थ्यांना करिअरबाबत मार्गदर्शन कार्यशाळेचे आयोजन स्थानिक प्रेस क्लब सभागृहात करण्यात आले होते. यावेळी ते बोलत होते. फ्री करिअर कौन्सिलिंग कार्यक्रमात जगदिश अग्रवाल यांनी लॉ, मेडिकल, इंजिनिअरिंग, वाणिज्य शाखेसह इतर शाखांमध्ये उपलब्ध नोकरीच्या संधीबाबत मार्गदर्शन केले. यावेळी विद्यार्थ्यांनी पॉलिटेक्नीक, जर्नालिझम, इंडियन अॅडमिनीस्ट्रेटिव्ह सर्विस, चार्टर अकाऊंटन्ट आदींसह विविध क्षेत्रातील करिअरबाबत प्रश्न विचारले. जगदिश अग्रवाल यांनी विद्यार्थ्यांच्या प्रश्नांना सकारात्मक उत्तर देत त्यांच्या शंकाचे निरसन केले. विद्यार्थ्यांनी बाहेर शिक्षण घेणे म्हणजे, सर्वाधिक यशस्वीता हा गैरसमज सोडून वयाच्या १३ व्या वर्षापासूनच मेहनत करण्याची क्षमता अंगी बाळगावी व यशस्वी होण्याची स्वप्ने पाहावी, असे आवाहन अग्रवाल यांनी केले. कार्यशाळेला पालक लक्ष्मण दुबे, रवींद्र आयतुलवार यांच्यासह विद्यार्थिनी तेजस्वीनी बिट्टुरवार, श्रिया वडेट्टीवार, भाग्यश्री चंद्रमा, साहिल उरकुडे, अंकित आयतुलवार, रोषण गिरसावडे, अली हेमानी, प्रतीक ढोके, वेदांत येवले, विनल पवार, सुशांत म्हशाखेत्री, अर्पित चलाख, अर्पिता दुबे, अनिकेत शेंडे, सिध्दांत मून, कार्तिकेय कोरंटलावार उपस्थित होते. कार्यक्रमाचे आभार बाल विकास मंचच्या संयोजिका किरण पवार यांनी मानले. (शहर प्रतिनिधी)योग्य व सक्षम कोचिंग क्लासेसची करा निवडशालांत परीक्षेनंतर कोचिंग क्लासेसची भाऊगर्दी दिसते. प्रत्येक क्लासेस विद्यार्थ्यांना प्रवेश देऊ इच्छितो, परंतु विद्यार्थ्यांना क्लासेसची निवड करताना महत्त्वपूर्ण बाबींकडे लक्ष द्यावे. ५०० हून अधिक विद्यार्थी संख्या असणाऱ्या क्लासेसमध्ये प्रवेश घेऊ नये, प्रवेशासाठी वारंवार विचारणा करणाऱ्या क्लासेस चालकांना भाव देऊ नये. जाहिरातीच्या माध्यमातून प्रवेशपात्र विद्यार्थ्यांची मने वळविणाऱ्या क्लासेसच्या भूलथापांना बळी पडू नये. मोजकी विद्यार्थी संख्या व योग्य मार्गदर्शन लाभेल अशाच कोचिंग क्लासेसची निवड विद्यार्थ्यांनी करावी. करिअर निवडताना मानसोपचार तज्ज्ञांचा सल्ला घेऊन स्वत:मधील उणीवा शोधून काढाव्या. त्यानंतर उपचारात्मक उपायांवर भर देऊन त्यांची पूर्तता करावी, ज्या विषयात सर्वाधिक रूची अशाच विषयाची करिअर घडविण्याकरिता निवड करावी, असे मार्गदर्शन जगदिश अग्रवाल यांनी केले.अॅप्टिट्युड टेस्टवर द्या भरशालांत परीक्षेनंतर करिअर निवडताना विद्यार्थ्यांना विशेष रूची असणाऱ्या विषयाची निवड करावी. नैसर्गिक क्षमता किंवा कौशल्य चाचणी (अॅप्टिट्युड टेस्ट) करून स्वत:ला करिअरच्या क्षेत्रात झोकून द्यावे. परंतु अॅप्टिट्युड टेस्ट करताना विषयाची रूचीवर सर्वाधिक भर द्यावा. कौशल्य परीक्षण करताना कुठल्या क्षेत्रात सर्वाधिक आवड आहे, याबाबत स्वत: निर्णय घ्यावा. शालेय विद्यार्थ्यांना इमोशनल सपोर्टची आवश्यकता असते. त्यामुळे आई-वडिलांकडून भावनात्मक आधार घेऊन करिअर निवड करावी व त्यात यशस्वी होण्याकरिता अभ्यासात सातत्य ठेवण्याचा प्रयत्न करावा, तेव्हाच व्यक्ती यशस्वी होऊ शकतो.
करिअर घडविण्यासाठी अंतर्मनाची जिद्द आवश्यक
By admin | Updated: April 5, 2015 01:49 IST