गडचिरोली : १० ते १२ वर्षांपूर्वी तत्कालीन काँग्रेस सरकारच्या काळात एटापल्ली तालुक्यातील सुरजागड पहाडीवर दहा खासगी कंपन्यांना पाच हजार हेक्टरहून अधिक लिज लोहखनिज उत्खननासाठी दिली होती. या कंपनीपैकी लॉयडस् मेटल या कंपनीने दोन महिन्यांपूर्वी येथे उत्खननाचे काम सुरू केले होते. मात्र या कामाला भाजप वगळता विविध राजकीय पक्षांनी व सामाजिक संघटनांनी विरोध केला. उत्खनन करून वाहतूक होत असलेला माल नेण्यात येऊ नये, अशी भूमिका घेतली. त्यामुळे कंपनीने हे काम बंद करून येथून गाशा गुंडाळला. माओवादी संघटनांनीही मधल्या काळात या प्रकल्पाच्या विरोधात पत्रकबाजी केल्यामुळे व आंदोलन करणाऱ्यांच्या विरोधात नामोल्लेख केल्यामुळे केंद्र सरकारने गंभीर दखल घेत या भागात लोहखनिज प्रकल्पांना सुरक्षा कवच देण्याबाबत कठोर पावले उचलले आहेत. येथे सीआरपीएफचे आणखी काही बटालियन आणून या भागात उद्योगधंदे सुरू करण्याबाबत केंद्र सरकार गंभीरपणे काम करीत आहे. भारतीय जनता पक्षाने सुरजागड प्रकल्पाच्या निर्मितीला पाठींबा दर्शविला असल्यामुळे या भागात उद्योग सुरू होण्याची दाट शक्यता निर्माण झाली आहे. आगामी काळात बेरोजगारांसाठी अच्छे दिन येण्याची शक्यता आहे.
सुरजागड प्रकल्पाचे काम सुरू करण्यासाठी हालचाली सुरू
By admin | Updated: July 1, 2016 01:19 IST