रमेश मारगोनवार
लोकमत न्यूज नेटवर्क
गडचिरोली : सिंचनाचा सुविधेपासून वंचित असलेल्या भामरागड तालुक्यातील गावांमध्ये शेतकऱ्यांना सिंचनाची सुविधा निर्माण होण्यासाठी लोकबिरादरी प्रकल्पाने तलाव निर्मितीचे काम हाती घेतले. गेल्या तीन वर्षांत २५ तलावांचे काम पूर्णत्वास गेले आहे. या तलावांत साचणाऱ्या पाण्यातून आता तालुक्यातील शेतकऱ्यांना सिंचनाची सुविधा मिळणार असून, त्यामुळे शेतकऱ्यांना पावसाच्या पाण्यावर विसंबून न राहता रब्बी हंगामातही पीक घेता येणार आहे.
भामरागड तालुका हा अनेक वर्षांपूर्वी राज्यपालांनी दत्तक घेतलेला तालुका आहे. मात्र, या तालुक्यातील विविध समस्या अजूनही आ वासून उभ्या आहेत. इंद्रावती, पामुलगौतम, पर्लकोटा या बारमाही वाहणाऱ्या नद्या असूनही सिंचनाची सुविधा नाही. वनक्षेत्र आणि इतर तांत्रिक अडचणींमुळे मोठ्या नद्या असूनही त्या पाण्याचा सिंचनासाठी उपयोग करणे आतापर्यंत जमले नाही. परिणामी आजही तालुक्यातील शेतकऱ्यांना पावसाच्या पाण्यावरच शेती करावी लागते.
ही परिस्थिती दूर करण्यासाठी लोकबिरादरी प्रकल्पाचे संचालक अनिकेत आमटे यांनी शेतकऱ्यांच्या सहभागातून काही गावांमध्ये तलाव निर्माण करण्याचे काम २०१६ पासून हाती घेतले. भामरागड तालुक्यातील जिंजगावातून तलाव निर्मितीचे काम सुरू केले. अहेरी तालुक्यातील वेडमपल्ली येथील तलावाचे काम नुकतेच पूर्ण झाले. आतापर्यंत विविध गावांत असे २५ तलाव तयार करण्यात यश आले.
पुढेही शक्य ती मदत करणार
याबाबत बोलताना अनिकेत आमटे यांनी सांगितले, भामरागड तालुक्यात बारमाही वाहणाऱ्या नद्या असूनही सिंचन सुविधेअभावी शेतीचा विकास झाला. ही बाब लक्षात घेऊन तलाव निर्मितीचा संकल्प केला. या तलावांच्या पाण्यामुळे शेतकऱ्यांना पीक घेणे सोयीचे होईल. कोरड्या दुष्काळापासून शेती वाचविता येईल. तसेच त्या तलावात मासेमारीही करता येईल. एवढेच नाही तर जमिनीतील पाणी पातळी वाढेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. अनेक गावकऱ्यांनी आमच्या गावात तलाव निर्माण करा, अशी मागणी केली आहे. त्यामुळे पुढेही शक्य होईल तेवढी मदत शेतकऱ्यांसाठी करणार, असे अनिकेत यांनी सांगितले.