खासदारांचे प्रतिपादन : जिल्हास्तरीय युवा महोत्सवाचा समारोपगडचिरोली : गडचिरोली जिल्ह्यात अतिशय गुणवंत व प्रतिभावान खेळाडू आहेत. त्यांच्या क्षमतांचा विकास करण्यासाठी त्यांना सोयीसुविधा उपलब्ध करून देण्याची गरज होती. गडचिरोली जिल्ह्याच्या विकासासाठी केंद्र व राज्य शासनाकडून कोट्यवधी रूपयांचा निधी उपलब्ध होतो. मात्र अधिकाऱ्यांच्या निष्क्रियतेमुळे सदर निधी वापस जातो. त्यामुळे गडचिरोली जिल्ह्याचा विकास पाहिजे त्या प्रमाणात होऊ शकला नाही. युवकांनी परिस्थितीशी झगडून क्रीडा प्रकारात राज्य व राष्ट्रीय पातळीवर नैपुन्य मिळवावे, असे प्रतिपादन खासदार अशोक नेते यांनी केले. युवा कार्यक्रम व भारत सरकारच्या खेल मंत्रालय तसेच डॉ. बी. आर. आंबेडकर फाऊंडेशन, सामाजिक न्याय व सक्षमीकरण मंत्रालय भारत सरकारद्वारा आयोजित डॉ. बाबासाहेब आबेडकर यांच्या १२५ व्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त नेहरू युवा केंद्र गडचिरोलीच्या वतीने जिल्हास्तरीय क्रीडा महोत्सवाचे आयोजन करण्यात आले. या महोत्सवाच्या समारोपीय कार्यक्रमाच्या बक्षीस वितरणाप्रसंगी अध्यक्षस्थानावरून खासदार बोलत होते. प्रमुख अतिथी म्हणून जिल्हा संघटन सरचिटणीस बाबुराव कोहळे, जिल्हा सचिव डॉ. भारत खटी, गडचिरोलीचे पोलीस पाटील अनिल खेवले, नेहरू युवा केंद्राचे जिल्हा समन्वयक दहेगावकर, लेखापाल अखिलेश मिश्रा, मनोहर हेपट आदी मान्यवर उपस्थित होते. स्पर्धेतील विजेत्यांचा मान्यवरांच्या हस्ते सन्मानिचिन्ह व प्रशस्तीपत्र देऊन गौरव करण्यात आला. यशस्वीतेसाठी रूपचंद मेश्राम, प्रकाश कुनघाडकर, सागर कुकुडकर, आशिष म्हशाखेत्री, अरविंद निकुरे, सुनील चुधरी, अमित कुमटे, गोपाल कुकुडकर, रोशन चापले, निकेश डाकोटे, प्रमोद भोयर, दिवाकर मोटघरे यांनी सहकार्य केले. (नगर प्रतिनिधी)
अधिकाऱ्यांच्या निष्क्रियतेने विकास अडला
By admin | Updated: March 20, 2016 02:13 IST