देसाईगंज : महाराष्ट्रामध्ये गडचिरोली जिल्हा नवीन कुष्ठरुग्ण निघण्याच्या प्रमाणात प्रथम क्रमांकावर असून, त्यात वडसा तालुका लोकसंख्येच्या मानाने रुग्णाचे प्रमाण जास्त आहे. रुग्णाचे प्रमाण कमी करण्यासाठी वैद्यकीय अधिकारी, आरोग्य कर्मचारी, तसेच आशा कार्यकर्ती यांनी आपल्या नियमित गृहभेटीवर लक्ष केंद्रित करणे आवश्यक आहे, असे प्रतिपादन, आरोग्य सेवा कुष्ठरोग गडचिरोलीचे सहायक संचालक डाॅ. सचिन हेमके यांनी केले.
राष्ट्रीय कुष्ठरोग निर्मूलन कार्यक्रमांतर्गत सहायक संचालक आरोग्य सेवा कुष्ठरोग गडचिरोली, आरोग्य विभाग जिल्हा परिषद, गडचिरोली व तालुका आरोग्य अधिकारी वडसा यांच्या संयुक्त विद्यमाने वैद्यकीय अधिकारी व आरोग्य कर्मचाऱ्यांचे एक दिवसीय कुष्ठरोगाविषयी प्रशिक्षण देसाईगंज येथे घेण्यात आले. यावेळी ते बाेलत हाेते.
नवीन कुष्ठरोग संशयित शोधण्यासाठी डाग किंवा चट्टे तपासणी आवश्यक असून, जेणेकरून रुग्णाला विकृती येणार नाही, लवकर निदान करता येईल. यासंदर्भात, तसेच रेबीज या आजाराविषयी सहायक आराेग्य अधिकारी तथा साथराेग अधिकारी डॉ. विनोद म्हशाखेत्री यांनी मार्गदर्शन केले.
कुष्ठरोगाविषयी शास्त्रीय माहिती, लक्षणे, अधीक्षयान काळ, निदान व उपचार, विकृती रुग्णाला दिल्या जाणाऱ्या संदर्भ सेवेबद्दल अवैद्यकीय सहायक राजेश पराते यांनी माहिती दिली. ग्रामीण रुग्णालय वडसा येथे दर मंगळवारी कुष्ठरोग संदर्भ सेवा केंद्रामध्ये उपलब्ध सेवा व सुविधा, तसेच गडचिरोली जिल्ह्यात सुरू असलेल्या नावीन्यपूर्ण कुष्ठरोग संदर्भ सेवा मोबाइल व्हॅन, फिरते पथक याबाबत कुष्ठरोग तंत्रज्ञ दिनकर संदोकर यांनी माहिती दिली.
क्षयरोग लक्षणे निदान व उपचाराबाबत जिल्हा पर्यवेक्षक उद्धव डाबरे यांनी माहिती दिली.
संचालन व प्रास्ताविक सावंगीचे वैद्यकीय अधिकारी डॉ. अशोक गहाणे यांनी केले. आभार डॉ. पी. जी. सडमेक यांनी मानले. प्रशिक्षणाच्या यशस्वीतेसाठी तालुक्यातील समुदाय आरोग्य अधिकारी, आरोग्य सहायक, आरोग्य सेवक, औषध निर्माण अधिकारी, आशा समन्वयक, संदीप हुमणे, कविता आठवले, प्रियंका पुराम, धम्मदीप मेश्राम यांनी सहकार्य केले.