आंदोलनाचा इशारा : कोटा ५० टक्के करागडचिरोली : गडचिरोली जिल्ह्यात वन विभागाच्या यादीत १७७ अनुकंपाधारकांचा समावेश आहे. यापैकी वन विभागाने २०१४ च्या भरतीत केवळ २३ अनुकंपाधारकांना सेवेत घेतले आहेत. अनेक अनुकंपाधारक गेल्या १० ते १२ वर्षांपासून नोकरीच्या प्रतीक्षेत आहे. या अनुकंपाधारकांना वनविभागाने सेवेत सामावून घ्यावेत, अशी मागणी करीत या संदर्भात वनमंत्र्यांनी आठ दिवसात निर्णय न घेतल्यास आंदोलन करण्यात येईल, असा इशारा मंगळवारी आयोजित पत्रकार परिषदेत सामाजिक कार्यकर्ते विजय खरवडे यांच्यासह अनुकंपाधारकांनी दिला.या संदर्भात वनमंत्री सुधीर मुनगंटीवार, वन विभागाचे सचिव तसेच मुख्य वन संरक्षकांकडे निवेदन देऊन चर्चा केली आहे. मात्र अनुकंपाधारकांना सेवेत घेण्यात आले नाही. शासनाने अनुकंपाधारकांचा शासकीय सेवेतील कोटा ५ टक्क्यावरून १० टक्के केला आहे. मात्र सदर कोटा कमी पडत असल्याने अनेक अनुकंपाधारक नोकरीपासून वंचित राहणार आहेत. त्यामुळे वन विभागाने अनुकंपाधारकांमधून ५० टक्के जागा भराव्यात, अशी मागणी अनुकंपाधारकांनी केली. यावेळी उमेश चुधरी, प्रकाश सिडाम, शाम पसपुनवार, व्यंकटेश गड्डमवार, विक्रांत दुर्गे, गणेश मरस्कोल्हे, चंद्रकला बगळे, ममता देवारे उपस्थित होते. (प्रतिनिधी)
अनुकंपधारकांना सेवेत सामावून घ्या
By admin | Updated: January 13, 2016 01:56 IST