सिरोंचा : शासकीय जमिनीवर मागील १० वर्षांपासून झोपड्या बांधून वास्तव्यास असलेल्या नागरिकांना शनिवारी महसूल व वन विभागाने संयुक्त कारवाई करून हटविले. त्यांच्या झोपड्याही उद्ध्वस्त केल्या. त्यामुळे ऐन पावसाळ्यात हे गरीब नागरिक अडचणीत आले आहेत. या नागरिकांना त्वरित न्याय द्यावा, अशी मागणी बहुजन समाज पार्टीने जिल्हाधिकारी गडचिरोली यांच्याकडे केली आहे. मागील १० वर्षापासून सिरोंचा गावातील भूमिहीन गरीब नागरिक सरकारी जागेवर झोपड्या करून राहत होते. परंतु आज अचानकपणे त्यांच्यावर कारवाई करून वन व महसूल प्रशासनाने त्यांच्या झोपड्या उद्ध्वस्त केल्या. त्यांचे सामान ट्रकमध्ये भरून वन विभागाच्या कार्यालयात जमा केले. त्यामुळे या ठिकाणी राहणाऱ्या नागरिकांसमोर उदरनिर्वाहाचा प्रश्न उपस्थित झाला आहे. अनेक कुटुंबात लहान मुले, मुली आहेत. आजच्या कारवाईमुळे हे सारे कुटुंब उघड्यावर आले आहेत. प्रशासनाने यांना पर्यायी जागा न देता हटविल्याने या नागरिकांमध्ये कमालीचा रोष आहे. या घटनेच्या संदर्भात सिरोंचा तालुका बंदचे आवाहन बहुजन समाज पार्टीने केले असून या संदर्भात प्रशासनाने तत्काळ दखल घ्यावी, अशी मागणीही शंकर बोरकुटे, अशोक दुर्गम, महेश कावरे, स्वामी आलुरी, सतीश मच्चावार, ब्रह्मय्या कावरे, राजेश कुमरी, डोंगरे व्यंकटी, अजगर अमिर खान, रवी कालकोटा आदींनी केली आहे. सदर कारवाई करताना वन व महसूल प्रशासनाचे जबाबदार अधिकारी उपस्थित होते. यावेळी चोख बंदोबस्तही ठेवण्यात आला होता. ट्रॅक्टरद्वारे हे सर्व सामान वन विभागाच्या कार्यालयात भरून नेण्यात आले. गडचिरोली जिल्ह्यात प्रशासनाने शेकडो नागरिकांना वन जमिनीवर अतिक्रमण केले म्हणून वनपट्टे देण्याचे काम केले. असे असताना सिरोंचा या दुर्गम व सीमावर्ती तालुक्यात मात्र नागरिकांचे अतिक्रमण काढण्याची कारवाई करण्यात आली. या घटनेबाबत तेथील रहिवाशांनी प्रचंड नाराजी ‘लोकमत’शी बोलताना व्यक्त केली. (तालुका प्रतिनिधी)
सिरोंचात झोपड्या हटविल्या
By admin | Updated: July 19, 2014 23:53 IST