यावर्षी रब्बी हंगामातील धान खरेदी केंद्र तब्बल एक महिना उशिरा सुरू झाले. त्यातच आदिवासी विकास महामंडळाच्या नियोजन शून्यतेमुळे खरेदी केंद्रावर बारदान उपलब्ध झाले नाही. धानाची विक्री करून १५ दिवसांचा कालावधी उलटला; परंतु चुकारे देण्यास दिरंगाई होत असल्यामुळे शेतकरी त्रस्त आहेत. दरवर्षी धान खरेदी केंद्रावर शेतकरी बांधवांना अनेक अडचणींचा सामना करावा लागताे. तरी प्रशासन उपायोजना करीत नाही. सध्या शेतकरी धान बियाणे, खते, औषधी व अन्य कृषी निविष्ठा खरेदीसाठी लगबग करीत आहेत. त्यामुळे खरेदी केंद्रावर विकलेल्या धानाचे चुकारे त्वरित द्यावेत तसेच शेतकऱ्यांचा मागीलवर्षीच्या बारदानाची रक्कम अदा करावी. रब्बी हंगामातील खरेदी केंद्रांवर बारदाना उपलब्ध करावा, आविका संस्थेचे कमिशन मंडी चार्ज देण्यात यावे व केंद्रावर असलेला धानाची त्वरित उचल करावी, अशी मागणी भारतीय जनता युवा मोर्चाचे जिल्हाध्यक्ष तथा आदिवासी विविध कार्यकारी सहकारी संस्थेचे उपाध्यक्ष चांगदेव फाये यांनी केली आहे.
रब्बी हंगामात विक्री केलेल्या शेतकऱ्यांचे धानाचे चुकारे द्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 11, 2021 04:25 IST