दिगांबर जवादे - गडचिरोलीपाच वर्षांपूर्वी शहरातील व गावातील सर्व नागरिकांना खबरबात देणाऱ्या दूरध्वनी सेवेचा मोबाईल क्रांतीने घास घेतला असून दूरध्वनी संच बंद होण्याची संख्या झपाट्याने वाढली आहे. २०१० साली जिल्ह्यात ८ हजार ८५४ दूरध्वनी जोडण्या होत्या. नोव्हेंबर २०१४ पर्यंत केवळ ४ हजार ८१६ जोडण्या चालू आहेत. दूरसंचार क्षेत्रात क्रांती निर्माण करण्याचे महत्त्वाचे पाऊल दूरध्वनी सेवेपासून सुरू झाले. दूरध्वनी सेवेचे फायदे नागरिकांच्या लक्षात आल्यानंतर शहरासह ग्रामीण भागातही दूरध्वनी जोडण्यांची मागणी होऊ लागली होती. त्यामुळे शासनाने ग्रामीण भागातही दूरध्वनी सेवा सुरू केली. नागरिकही दूरध्वनी जोडणी घेण्यास विशेष पसंती दर्शवित होते. त्यामुळे शहरात प्रत्येक घरी व गावात किमान १० नागरिकांच्या घरी दूरध्वनीचा संच खणखणत होता. हा ध्वनी अचानक बंद होईल, अशी अपेक्षाही नव्हती. मात्र २००८ पासून खऱ्या मोबाईल क्रांतीला सुरूवात झाली. मोबाईल दूरध्वनीपेक्षा वापरण्यास अधिक सोयीस्कर व कमी खर्चाचेही असल्याने नागरिकांचा ओढा मोबाईलकडे वाढला. त्यानंतर मोबाईलमध्ये फोनसह इंटरनेट, आॅडीओ, व्हिडीओ, कॅमेरा आदी सुविधा कंपन्यांनी देण्याबरोबरच किंमतीही सामान्य नागरिकांच्या आवाक्यात आणल्या त्यामुळे मोबाईलची संख्या झपाट्याने वाढली. २०१० साली गडचिरोली जिल्ह्यात ८ हजार ८५४ लँडलाइन जोडण्यात होत्या. त्यांची संख्या प्रतीवर्षी जवळपास एक हजाराने घटत नोव्हेंबर २०१४ पर्यंत आता केवळ ४ हजार ८१६ जोडण्या शिल्लक आहेत. तर मोबाईलधारकांची संख्या झपाट्याने वाढत चालली आहे. २०११ साली बीएसएनएलचे १ लाख ३६ हजार ५४६ मोबाईलधारक होते. ही संख्या वाढून सद्य:स्थितीत बीएसएनएलचे १ लाख ८० हजार ९२९ ग्राहक आहेत. वाढत्या मोबाईलच्या संख्येनेच लँडलाईनचा घास घेतला आहे. सद्य:स्थितीत लँडलाईन सेवा केवळ शासकीय, निमशासकीय व कंपन्यांची कार्यालये यांच्या पुरताच मर्यादित राहिली आहेत. प्रत्येक लँडलाईन जोडणीवर महिन्याचे १२० रूपये फिक्स चार्ज आकारले जाते. त्यावर केवळ ५० कॉल मोफत दिले जातात. त्या तुलनेत १२० रूपयाच्या मोबाईल रिचार्जमध्ये मोबाईलधारक किमान १०० मिनिटे बोलू शकतो. फिक्स चार्जमुळेही दूरध्वनी जोडण्या बंद होण्याचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत चालले आहे. संपूर्ण देशात २००५ मध्ये ५ कोटी १ लाख ८० हजार जोडण्या होत्या. सप्टेंबर २०१४ पर्यंत ही संख्या २ कोटी ७४ लाख ५ हजार ९०१ एवढी राहिली आहे. सप्टेंबर या एका महिन्यात तब्बल १ लाख १७ हजार ३१९ दूरध्वनी जोडण्या बंद करण्यात आल्या आहेत.
चार वर्षात जिल्ह्यातील निम्मे दूरध्वनी संच पडले बंद
By admin | Updated: December 8, 2014 22:34 IST