भामरागड : आदिवासी व दुर्गम भाग म्हणून ओळखल्या जाणाऱ्या भामरागड परिसराला गर्द जंगलाचा वेढा. या घनदाट जंगलात आशेची किरण निर्माण झाली. २३ डिसेंबर १९७३ रोजी येथे पहिल्यांदा अविकासाच्या अंधारावर प्रकाशाची लेणी कोरणारी नवी प्रकाश वाट तयार झाली. रॅमन मॅगसेसे पुरस्कार प्राप्त समाजसेवक डॉ. प्रकाश व मंदाकिनी आमटे या दाम्पत्याने लोक बिरादरी प्रकल्पाच्या रूपात प्रकाशित केलेली ही प्रकाशवाट उद्या २३ डिसेंबर रोजी एकेचाळीशी पूर्ण करीत आहे. २६ डिसेंबरला बाबांचा जन्मदिन आहे. त्यामुळे यंदाचे वर्ष स्व. बाबा आमटे यांचे जन्मशताब्दी वर्ष म्हणून साजरे केले जाणार आहे. यानिमित्ताने विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. कर्मयोगी बाबा आमटे यांनी ४१ वर्षापूर्वी भामरागड जवळील हेमलकसा येथे लोकबिरादरी प्रकल्पाची स्थापना २३ डिसेंबर १९७३ ला केली. यावर्षी लोक बिरादरी ४१ व्या वर्षात पदार्पण करणार आहे. यानिमित्त २३ ते २६ डिसेंबर या कालावधीत प्रकल्पाच्या परिसरात विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. आदिवासी बांधव व विद्यार्थ्यांसाठी ही पर्वणीच आहे. २३ व २४ डिसेंबरला लोकबिरादरी आश्रम शाळेच्या स्नेह संमेलन व सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहेत. या कार्यक्रमात सृजनशील प्रयोग, अंधश्रध्दा निर्मुलनात्मक जादूचे प्रयोग आदी कार्यक्रम घेण्यात येणार आहे. २५ डिसेंबरला सायंकाळी ७.३० ते ८.३० वाजेपर्यंत बाबांच्या आठवणी व बाबांचा माझ्या कार्यावरचा प्रभाव - बाबांपासून प्रेरणा घेतलेल्या व्यक्तींच्या मुलाखती मुलाखतकार सुधीर गाडगीळ घेणार आहेत. २६ ला उद्घाटन तसेच विविध कार्यक्रम पार पडणार आहेत. २७ ला वृक्षदिंडी व वृक्षारोपण केले जाणार आहे.डॉ. प्रकाश व मंदाकिनी आमटे या भामरागड तालुक्यातील हेमलकसा परिसराते आले तेव्हा येथे कोणत्याच सोयीसुविधा नव्हत्या. येथील आदिवासींंना गोंडी, माडिया भाषेशिवाय दुसऱ्या भाषेचा गंधही नव्हता. मात्र या दाम्पत्याने येथील गोरगरीब आदिवासींवर औषधोपचार करीत त्यांची मने जिंकली.आश्रमशाळा प्रारंभ करून शिक्षणाची दारेही मोकळी करून दिली. या सेवाकाळाचे ४१ वर्ष पूर्ण होत आहेत. (तालुका प्रतिनिधी)
लोकबिरादरीला चार दशक पूर्ण
By admin | Updated: December 22, 2014 22:46 IST