आष्टीच्या पुलाला झाले ५६ वर्ष : ग्रामीण भागाच्या दळणवळणाला पावसाळ्यात त्रास गडचिरोली : ब्रिटीश काळात बांधलेला एकही पूल गडचिरोली जिल्ह्यात नसला तरी देशाच्या स्वातंत्र्यानंतर तयार करण्यात आलेला चंद्रपूर-आलापल्ली मार्गावरील आष्टीचा पूल ठेंगणा व अरूंद असल्यामुळे या पुलावरून आजवर अनेकांचा वाहन कोसळून बळी गेला आहे. हा पूल आता कालबाह्यच झाला असल्याने नवीन पूल बांधकाम करण्यात यावे, अशी मागणी गेल्या अनेक वर्षांपासून आहे. गडचिरोली जिल्ह्यातील ठेंगणे व अरूंद पूल हे वाहतुकीसाठी ग्रामीण भागात नेहमीच अडचणीचे ठरलेले आहे. गडचिरोली जिल्ह्यात ८.३६ किमी लांबीचे प्रमुख जिल्हा मार्ग आहे. याशिवाय १०३५.५५ किमीचे राज्य महामार्ग आहेत. याशिवाय ८६१ किमी लांबीचे प्रमुख राज्य मार्ग आहेत. या मार्गावर २ हजार १८३ छोटे पूल असून ३३८ मध्यम व ४४ मोठे पूल आहेत. याशिवाय २५० मीटरपेक्षा अधिक लांबीचे सहा लाँगब्रिज असल्याची माहिती सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधीक्षक अभियंता प्रदीप खवले यांनी लोकमतशी बोलताना दिली. दरवर्षी प्री मान्सून व मान्सूननंतर या पुलाची तपासणी केली जाते व त्याचा अहवाल तयार केला जातो. जिल्ह्यातील सर्व पूल हे मागील २० ते २५ वर्षात तयार झालेले आहेत. त्यामुळे ते सुस्थितीत आहे. असे सार्वजनिक बांधकाम विभाग सांगत असला तरी भामरागड तालुक्यात पर्लकोटा नदीचा पूल, अहेरी-आष्टी मार्गावर दिना नदीचा पूल, गडचिरोली-नागपूर मार्गावर आरमोरी तालुक्यात गाढवी नदीचा पूल, आष्टी-चंद्रपूरला जोडणारा वैनगंगा नदीचा पूल तसेच वैरागड-मानापूर रस्त्यावरील वैलोचना नदीवरील पूल हे पूल ठेंगणे, अरूंद व जुने असल्याने या ठिकाणी वारंवार अपघात वाहन पुलावरून पडून होतात. मागील १० वर्षात १५ ते १८ लोकांचे बळी या अपघातात गेलेले आहेत. मात्र या पुलाची उंची वाढविण्याचे काम अजुनही झालेले नाही. दिना नदीवरील पुलामुळे अहेरी, एटापल्ली, भामरागड, सिरोंचा तालुक्याच्या वाहतुकीचा मार्ग बंद होत असतो, गडअहेरी नाल्यावरचाही ठेंगणा पूल असल्याने दरवर्षी पावसाळ्यात हा मार्ग बंद होतो. त्यामुळे हे पूल उंच करणे आवश्यक आहे. जिल्ह्यात ब्रिटीशकालीन एकही पूल नसला तरी जिल्ह्यातील नागपूर-आरमोरी मार्गावरील पुलावरूनही दररोज तीन ते साडेतीन हजार वाहनांचे आवागमन आहे. अशा अवस्थेतही सरकारी यंत्रणेचे पूल उंच करण्याच्या कामाकडे सातत्याने दुर्लक्ष आहे. (जिल्हा प्रतिनिधी) अप्रोच रस्ते वाहून जाऊ शकतात, मात्र पूल नाही! गडचिरोली जिल्ह्यात जुने व ठेंगणे पूल असले तरी ते वाहून जाण्याची शक्यता नाही. अनेकदा या पुलावर पुराचे पाणी दोन-दोन दिवस राहते. अशा स्थितीतही पुलाला काहीही होत नाही. ठेंगणे पूल हे नेहमीच अतिवृष्टीच्या परिस्थितीत धोकादायक नसतात. मात्र उंच पूल अशा स्थितीत नेहमीच धोकादायक ठरू शकतात. याच्या कमानीपर्यंत पाणी आल्यास या पुलाचे दगड खचून पूल वाहून जाण्याची शक्यता अधिक असते. गडचिरोली जिल्ह्यात मात्र माती मृदू असल्याने पुलाच्या बाजुला टाकलेल्या पिचिंग जवळील माती वाहून जाण्याच्या घटना घडलेल्या आहेत. अशा वेळी सर्वसामान्य नागरिक पूल वाहून गेला, असे समजतात. मात्र गडचिरोली जिल्ह्यातील जुने पूल जरी असले तरी ते सर्वदृष्टीने सुरक्षित आहे. बऱ्याचवेळा पिचिंग जवळची माती वाहून जाऊ शकते, असे मत अधीक्षक अभियंता प्रदीप खवले यांनी लोकमतशी बोलताना व्यक्त केले.
ठेंगणे, अरूंद पूल डोकेदुखीचेच
By admin | Updated: August 5, 2016 01:07 IST