लोकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली : शेतीच्या कामासाठी बैलांची जागा ट्रॅक्टरने घेतली असली बैलांचे महत्व कमी झाले नसल्याचा प्रत्यय सोमवारी बैलपोळ्याच्या निमित्ताने आला. ग्रामीण भागात तेवढ्याच उत्साहाने शेतकºयांनी आपल्या ‘ढवळ्या-पवळ्यां’ना सजवून पोळ्यात सहभाग घेतला. एवढेच नाही तर त्यांचे पूजनही केले.शेतकºयासोबत वर्षभर शेतीत राबणाºया बैलाचे उपकार फेडण्यासाठी शेतकरीवर्ग पोळा सण साजरा करतो. जिल्ह्यात धान पिकाची सर्वाधिक लागवड केली जाते. या पिकाच्या मशागतीसाठी बैल जोडी फार महत्त्वाची आहे. पोळ्यापूर्वीच धानाच्या रोवणीची कामे आटोपली आहेत. अधूनमधून पावसाच्या सरीही कोसळत आहेत. त्यामुळे मागील वर्षीप्रमाणे याही वर्षी धानाचे चांगले उत्पादन होईल, अशी आशा शेतकºयांना आहे. मर्यादीत प्रमाणात पाऊस झाल्याने, कापूस, सोयाबिन, तूर ही पिकेही शेतात डोलत आहेत. सरकारने नुकतीच कर्जमाफी केली आहे. आजवर कर्जाचे मनावर असलेले दडपणही काहीसे कमी झाले आहे. त्यामुळे शेतकºयांच्या चेहºयावर थोडेफार हास्य फुलले आहे.यावर्षी पावसाचे थोडे उशिरा आगमन झाले असले तरी नंतर पावसाने अधूनमधून हजेरी लावत साथ दिली. मध्यंतरी पावसाने दडी मारल्यानंतर पुन्हा आठ दिवसांपूर्वी पावसाने हजेरी लावल्याने रोवणी मार्गी लागली. हे काम जवळपास एक महिना चालत असल्याने रोवणी झाल्यानंतर शेतकºयांच्या डोक्यावरील मोठा भार कमी होतो. रोवण्यानंतर काही काळ विश्रांती घेतली जाते. याच कालावधीत पोळा आल्याने पोळाच्या आनंद द्विगुणीत झाला आहे.बदलत्या काळाच्या ओघात शेतीची साधने बदलली आहेत. बैलांची जागा ट्रॅक्टरने घेतली असल्याने यापूर्वी बैलपोळ्यात बैलजोड्यांची दिसणारी गर्दी थोडीफार कमी झाली असल्याचे दिसून येत होते.पोळ्याच्या सणानिमित्त ग्रामीण तसेच शहरी भागातही भांडण तंटे होण्याची शक्यता असल्याने पोलीस विभागाने अगोदरच शांतता सभा घेतल्या होत्या. पोळ्याच्या दिवशी चोख पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता. त्यामुळे कोणतीही अनुचित घटना घडली नाही.शहरी भागात महिला वर्गाला घरात बनविलेला नैवेद्य चारण्यासाठी आणि पूजनासाठीही बैल दिसत नव्हते. बालकांसाठी विविध खेळण्यांची दुकाने मात्र गडचिरोलीत सजलेली दिसत होती.कर्मचाºयांच्या आनंदावर विरजणदरवर्षी तान्हापोळ्याची सुटी राहत होती. सदर सुटी जिल्हाधिकाºयांच्या अधिकारातून देण्यात येत होती. मात्र यावर्षी ९ आॅगस्ट रोजी जागतिक आदिवासी दिनानिमित्त सुटी देण्यात आली होती. त्यामुळे तान्हा पोळ्याची सुटी रद्द झाली. तान्हापोळ्याच्या दिवशीही कर्मचाºयांना कार्यालयात जावे लागणार आहे. त्यामुळे तान्हापोळ्याच्या कर्मचाºयांच्या आनंदावर विरजण पडणार आहे. बहुतांश कर्मचाºयांनी सोमवारी अधिकाºयांकडून परवानगी घेऊन ३ वाजताच कार्यालय सोडले. त्यामुळे कार्यालये ओस पडली होती.
ग्रामीण भागात पोळ्याचा उत्साह
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 21, 2017 22:51 IST
शेतीच्या कामासाठी बैलांची जागा ट्रॅक्टरने घेतली असली बैलांचे महत्व कमी झाले नसल्याचा प्रत्यय सोमवारी बैलपोळ्याच्या निमित्ताने आला.
ग्रामीण भागात पोळ्याचा उत्साह
ठळक मुद्देशेतकºयांकडून झडत्यांची बरसात : रोवणी पूर्ण झाल्याने शेतकरी समाधानी, शहरी भागात मात्र निरस वातावरण