श्रीधर दुग्गीरालापाटीलाेकमत न्यूज नेटवर्ककमलापूर : राज्यातील एकमेव शासकीय हत्तीकॅम्प म्हणून ओळख असलेल्या कमलापूर कॅम्पमधील हत्तींची पर्यटकांना नेहमीच भुरळ पडली आहे. वर्षभर पर्यटक सुट्या घेऊन येथे हत्ती पाहण्यासाठी येतात; परंतु आता आयुर्वेदिक उपचारासाठी कॅम्पमधील संपूर्ण आठही हत्ती सुटीवर जाणार आहेत. कॅम्पपासून एक किमी अंतरावरील जंगल परिसरात त्यांचा वावर राहणार आहे, अशी माहिती वन विभागाच्या अधिकाऱ्यांनी दिली आहे.
वाढत्या थंडीमुळे हत्तींच्या पायांना भेगा पडून जखमा हाेण्याची शक्यता असते. अशा प्रकारची स्थिती उद्भवू नये यासाठी दरवर्षी डिसेंबर ते जानेवारी महिन्यात ४४ औषधी जडीबुटींचे मिश्रण तयार करून चोपिंग शेक दिला जातो. यामुळे हत्तींच्या नखापासून वरच्या भागापर्यंत भेगा पडत नाहीत. हत्तींचे आराेग्यही उत्तम राखण्यास मदत हाेते. हत्तींच्या पायांना आयुर्वेदिक उपचाराने आराम मिळावा यासाठी त्यांच्यावर आयुर्वेदिक औषधाेपचार केला जाणार आहे. याच उद्देशाने रविवारपासून पुढील सात दिवस कमलापूर येथील कॅम्पमध्ये हत्ती दिसणार नाहीत. कॅम्पपासून १ किमी अंतरावरील जंगलात नाल्यालगत हत्तींचा वावर राहणार आहे. त्यांच्यावर कर्मचाऱ्यांची देखरेख राहणार आहे. त्यामुळे पर्यटकांना हत्तींचे दर्शन घेता येणार नाही, असे वन विभागामार्फत कळविण्यात आले आहे.
सकाळीच हाेताे चाेपिंगअगदी सकाळी एखाद्या ड्रममध्ये आगीवर हा आयुर्वेदिक लेप तयार केला जाताे. त्यानंतर तब्बल दहा दिवसांनी हत्तींच्या पायांना लेप लावून उपचार केला जाताे. चाेपिंगच्या माध्यमातून हत्तींच्या पायांची, तसेच शरीराचीही देखभाल केली जाते.
चाेपिंगमध्ये काेणत्या वनस्पती?चाेपिंगसाठी आयुर्वेदिक औषधी तयार करताना हिरडा, बिबा, बेहडा, सुंठ, त्रिफळा, शेंगदाणा तेल, डिकामाली, ओवा, फूल, अस्मानतारा, नीळ, मोम, साबण, इलायची, गेरू, कथ्था, हिंग, जायफळ, सागरगोटा, मांजू फळ आदी वस्तूंसह आयुर्वेदिक वनस्पतींचा उपयाेग केला जाताे, अशी माहिती कमलापूरचे वन परिक्षेत्र अधिकारी पझारे यांनी दिली.