शिक्षकांसोबत चर्चा : नवीन इमारत बांधण्याचे आश्वासनलोकमत न्यूज नेटवर्कआरमोरी : तालुक्यातील शिवणी बुज येथील जिल्हा परिषद शाळेची इमारत जीर्ण झाली आहे. मात्र वर्ग भरविण्यासाठी दुसरी इमारत उपलब्ध नसल्याने नाईलाजाने जीर्ण इमारतीतच वर्ग भरवावे लागत आहेत. याबाबतचे वृत्त लोकमतने मंगळवारी प्रकाशित करताच शिक्षणाधिकारी एम. एन. चलाख यांनी या वृत्ताची दखल घेऊन मंगळवारी दुपारी १ वाजताच इमारतीची पाहणी केली. सदर इमारत निर्लेखित करून नवीन इमारतीचे बांधकाम करून देण्यासाठी आपण प्रयत्न करू, असे आश्वासन शाळा व्यवस्थापन समिती व शिक्षकांना शिक्षणाधिकारी चलाख यांनी दिले आहे.शिवणी येथे पहिले ते आठवीपर्यंत वर्ग आहेत. या शाळेत एकूण २२६ विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. आठ वर्गांसाठी केवळ सात वर्गखोल्या आहेत. एका वर्गाला वर्गखाली नसल्याने जुन्या कवेलूच्या इमारतीत वर्ग भरविला जात आहे. ३५ वर्षांपूर्वी बांधण्यात आलेली इमारत पूर्णत: जीर्ण झाली असून मोडकळीस आली आहे. इमारतीचे निर्लेखन करण्यासाठी तीन वर्षांपूर्वीच शिक्षण विभागाकडे प्रस्ताव सादर केला होता. मात्र याकडे शिक्षण विभागाने दुर्लक्ष केले होते. या इमारतीची भयावता दर्शविणारे वृत्त लोकमतने प्रकाशित केले. या वृत्ताची शिक्षणाधिकारी चलाख यांनी दखल घेतली. त्याच दिवशी त्यांनी शिवणी गाव गाठून इमारतीची पाहणी केली. त्यांच्या पाहणीदरम्यान वर्गखोलीमध्ये पाणी साचले होते. त्यामुळे इमारतीत वर्ग भरविणे कठीण झाले होते. नवीन इमारत बांधून देण्याबरोबरच या शाळेत रिक्त असलेल्या दोन शिक्षकांची पदे भरण्याचे आश्वासन शिक्षणाधिकारी चलाख यांनी दिले. शिक्षणाधिकाऱ्यांच्या या तत्परतेची शाळा व्यवस्थापन समिती सदस्य व गावकऱ्यांनी कौतुक केले.
शिक्षणाधिकाऱ्यांनी केली शिवणीतील जीर्ण शाळेची पाहणी
By admin | Updated: June 28, 2017 02:29 IST