व्यथा इंदिरा आवास योजनेची : आॅनलाईन प्रक्रिया झाल्याने अडचणगडचिरोली : दारिद्र्य रेषेखालील नागरिकांना हक्काचे घर मिळावे यासाठी राज्य शासनाने इंदिरा आवास घरकूल योजना अंमलात आणली. मात्र लाभार्थ्यांची प्रचंड अनास्था, यंदाच्या आॅनलाईन प्रक्रियेचा परिणाम व प्रशासकीय दिरंगाईमुळे गडचिरोली जिल्ह्यात घरकूल योजनेची गती प्रचंड मंदावल्याचे चित्र दिसून येत आहे. विशेष म्हणजे, गतवर्षीचे ५ हजार ९०२ घरकूल अपूर्ण असून यंदा २०१५-१६ वर्षातील मंजूर एकाही घरकुलाच्या कामाचा शुभारंभच झाला नाही. इंदिरा आवास योजनेंतर्गत यंदा २०१५-१६ वर्षासाठी जिल्ह्याला ४ हजार ७३६ घरकूल बांधकामाचे उद्दीष्ट देण्यात आले असून आॅगस्ट ते आॅक्टोबर या तीन महिन्यांच्या कालावधीत ४ हजार ७३६ पैकी ४ हजार ५६६ घरकुलांना मंजुरी देण्यात आली आहे. सध्या लाभार्थ्यांचे करारनामे, बँक खाते, जॉब कार्ड आदींची आॅनलाईन माहिती संकलित करण्याचे काम अंतिम टप्प्यात पोहोचले आहे. शिवाय चालू वर्षात मंजूर करण्यात आलेल्या ४५ टक्के लाभार्थ्यांच्या खात्यात पहिल्या हप्त्याचे प्रत्येकी ३७ हजार ५५० रूपयांचे अनुदान बँक खात्यात वर्ग करण्यात आले आहे. मात्र अद्यापही एकाही लाभार्थ्याने घरकुलाच्या कामाला सुरूवात केली नाही, अशी माहिती आहे. घरकूल बांधकामात प्रचंड दिरंगाई होत असल्याने शासनाने ठरवून दिलेल्या विहित वेळेत घरकुलाचे काम पूर्ण करणे अशक्यप्राय आहे. गतवर्षी २०१५-१६ च्या जुलै ते आॅगस्ट या दोन महिन्यांच्या कालावधीत उद्दीष्टांइतकेच एकूण ७ हजार ७९४ घरकूल मंजूर करण्यात आल्या. यामध्ये आदिवासी लाभार्थ्यांसाठी ६ हजार ७७८, अनुसूचित जातीच्या लाभार्थ्यांसाठी ५८१ व इतर लाभार्थ्यांसाठी ४३५ घरकूल मंजूर करण्यात आले. मात्र १८ डिसेंबर २०१५ या तारखेपर्यंत केवळ १ हजार ७३३ घरकुलांचे काम पूर्ण करण्यात आले असून तब्बल ५ हजार ९०२ घरकूल अपूर्ण स्थितीत आहेत. तसेच ३ हजार ९९६ घरकुलांचे काम केवळ जोतास्तरापर्यंत पोहोचले आहे. लाभार्थ्यांच्या उदासीनतेमुळे गडचिरोली जिल्ह्यात घरकूल बांधकामांची गती प्रचंड मंदावली असल्याचे दिसून येते. (स्थानिक प्रतिनिधी)घरकुलात अहेरी तालुका माघारलागतवर्षी २०१४-१५ मध्ये अहेरी तालुक्यात एकूण १ हजार ४२५ घरकूल मंजूर करण्यात आले. यापैकी केवळ ३६ घरकुलांचे काम पूर्ण करण्यात आले असून तब्बल १ हजार २६८ घरकुलांचे काम अपूर्ण स्थितीत आहे. आरमोरी तालुक्यातील २४३, भामरागड ५५६, चामोर्शी ५१६, धानोरा ७९९, एटापल्ली ४९५, गडचिरोली १६४, कोरची ५३६, कुरखेडा ५०९, मुलचेरा २११, देसाईगंज ३६ व सिरोंचा तालुक्यातील ५६९ घरकूल अद्यापही अपूर्ण आहेत. जिल्ह्यात घरकूल कामात अहेरी तालुका माघारला आहे.गतवर्षीच्या १५९ घरकुलांचा श्रीगणेशाच नाहीसन २०१४-१५ वर्षात मंजूर करण्यात आलेल्या सर्वच लाभार्थ्यांना अनुदानाच्या पहिल्या हप्त्याची रक्कम वितरित करण्यात आली आहे. मात्र अद्यापही तब्बल १५९ घरकुलांच्या कामाला सुरूवातच झाली नसल्याची धक्कादायक माहिती मिळाली आहे. यामध्ये अहेरी तालुक्यातील सर्वाधिक १२१, चामोर्शी तालुक्यातील ३३, धानोरा तालुक्यातील तीन व सिरोंचा तालुक्यातील दोन घरकूल बांधकामांना मुहूर्तच मिळाला नसल्याचे दिसून येते.
लाभार्थी उदासीनतेमुळे जिल्ह्यात जुने, नवे घरकूल रखडलेलेच !
By admin | Updated: December 20, 2015 01:17 IST