रमेश मारगोनवार - भामरागडआरोग्य सेवा हे व्रत म्हणून स्वीकारून अनेक आव्हानांचा सामना करत १९७४ पासून आरोग्याचा महायज्ञ चेतविणारे डॉ. प्रकाश व डॉ. मंदाकिनी आमटे हे गडचिरोली जिल्ह्याच्या आरोग्य सेवेचे देवदूतच म्हणावे लागेल. भामरागडसारख्या दुर्गम, अतिदुर्गम तालुक्यात हेमलकसा येथे २३ डिसेंबर १९७३ ला ज्येष्ठ समाजसेवक बाबा आमटे यांनी लोकबिरादरी प्रकल्पाची स्थापना केली व एप्रिल १९७४ मध्ये बाबांचे सुपुत्र डॉ. प्रकाश व त्यांची पत्नी डॉ. मंदाकिनी यांनी गवताने साकारलेल्या बांबूच्या झोपडीत आदिवासींसाठी दवाखाना सुरू केला. त्या दिवशीपासून सुरू झालेला आरोग्याचा हा महायज्ञ आता एका मोठ्या रूग्णालयात परिवर्तित झालेला आहे. मात्र वंचित आदिवासींसाठी हा दवाखाना म्हणजे एक मायेचे घरच आहे. या दवाखान्यात प्रेमाने रूग्णांची विचारपूस करणारे डॉ. प्रकाश व डॉ. मंदाकिनी हे खऱ्या अर्थाने सबंध रूग्णांचे दादा व वहिनीच, असे म्हटले तर वावगे होणार नाही. दवाखान्यासाठी स्वतंत्र इमारत आहे. ५० रूग्ण राहू शकतील असे सुसज्ज वॉर्ड आहेत. तसेच दवाखान्यात सोनोग्राफी, एक्स रे, पॅथॉलॉजी लॅब, डिलीवरी रूम व आॅपरेशन थिएटर अशा आधुनिक सोयी आदिवासींकरिता विनामूल्य उपलब्ध आहेत. डॉ. प्रकाश व मंदा तसेच त्यांचे थोरले सुपुत्र डॉ. दिगंत व त्यांची पत्नी डॉ. अनघा आदिवासींना लागणाऱ्या आरोग्यसेवेसाठी सदैव तयार असतात. या भागात प्रामुख्याने कुपोषण, जलोदर, हिवताप, क्षय, कावीळ, अॅनिमिया, सिकलसेल अॅनिमिया, कॅन्सर, जंगली श्वापदांच्या हल्ल्याने जखमी झालेले व सर्पदंश झालेले इत्यादी प्रकारचे रूग्ण आढळतात. दरवर्षी जवळपास ४५,००० रूग्ण लोक बिरादरी दवाखान्याचा विनामूल्य लाभ घेतात. २०० किलोमीटर परिसरातून महाराष्ट्र, छत्तीसगड व आंध्रप्रदेश या राज्यातील सुमारे १००० गावातून रूग्ण चालत, सायकलने वा शक्य असेल तर बसने या रूग्णालयात उपचारासाठी येतात. या दवाखान्याला सरकारी अनुदान नाही. वर्षभराचा प्रत्यक्ष खर्च सुमारे दहा लाख रूपये इतका आहे. हा सर्व खर्च जनसामान्यांच्या देणगीतून भागविला जातो. जंगलातल्या अतिमागास आदिवासींचा आता कुठे औषधोपचारावर विश्वास बसू लागला आहे. त्यामुळे शक्य तितक्या नेटाने हा दवाखाना चालविण्याचा आमटे दाम्पत्याचा निर्धार कायमच आहे.
वंचितांच्या सेवेसाठी झटणारे डॉक्टर
By admin | Updated: July 1, 2014 01:28 IST