पंचायत समितीचा पुढाकार : बचत गटाला यंत्र संचाचे वितरणअहेरी : कृषी यंत्राचा वापर करून शेतातील उत्पन्न वाढ करण्याच्या हेतूने कृषी विभागामार्फत मानव विकास मिशन योजनेंतर्गत कृषी यंत्रांचे वितरण केले जात आहे. या योजनेंतर्गत अहेरी पंचायत समितीमध्ये बुधवारी अश्विनी महिला बचत गट पेठाच्या सदस्यांना कृषी यंत्राच्या संचाचे वाटप करण्यात आले. ९० टक्के अनुदानावर शेतकरी बचत गटाला लाभ देण्यात आला. अहेरी पंचायत समितीच्या वतीने कृषी विभागांतर्गत २०१५- १६ या वर्षातील योजनेतून पॉवर टिलर १, भात रोवणी यंत्र १, कोनोविडरचे १० नग, धान कापणी यंत्र १, धान मळणी यंत्र १ नग आदी संचाचे वाटप करण्यात आले. पॉवर टिलरची किंमत १ लाख ४८ हजार, धान रोवणी यंत्र १ लाख ७० हजार, कोनोविडर १७ हजार १००, धान कापणी यंत्र १ लाख ३ हजार ८०४, धान मळणी यंत्र १ लाख १७ हजार ३९८ रूपये किमतीचे आहे. प्रत्येक यंत्रावर ९० टक्के अनुदान देत शेतकरी गटाला लाभ देण्यात आला. यावेळी पं. स. सदस्य ऋषी पोरतेट, श्रीनिवास गावळे, आलापल्लीचे ग्रा. पं. सदस्य कैलास कोरेत, कृषी अधिकारी वाय. बी. पदा, कृषी विस्तार सी. एस. नैताम, कनिष्ठ सहाय्यक गुरूदास कुळमेथे, बचत गटाच्या अध्यक्ष लक्ष्मी नैकुल, सचिव आकांक्षा नैकुल, सेवानिवृत्त कृषी विस्तार अधिकारी एच. के. फुलझेले, नीतेश मुलकरी, बापु नैकुल, विवेक बेझलवार उपस्थित होते. बचत गटाने ८२ हजार ८१२ रूपयांचा लोकवाटा उचलला. (शहर प्रतिनिधी)
अहेरीत कृषी यंत्राचे वाटप
By admin | Updated: November 19, 2015 01:59 IST