शहरात काही दिवसांपासून मोकाट कुत्र्यांची संख्या वाढली आहे. कळपाने कुत्री शहरातील रस्त्यावर व वॉर्डात फिरत असतात. रस्त्याने ये-जा करणारे वाहनधारक व पादचारी यांच्यावर भुंकने तसेच पाळीव प्राण्यावर हल्ला करणे ही नित्याचीच बाब झाली आहे. हे कुत्रे रस्त्यावर फिरत असल्याने अपघाताचा धोका वाढला आहे. लहान मुले रस्त्याने जाण्यास घाबरत आहेत. रात्री जोरजोरात भुंकण्यामुळे नागरिकांची झोपमोड होत आहे. तसेच ठिकठिकाणी शौच करीत असल्याने दुर्गंधी निर्माण होत आहे. विशेष म्हणजे, काही नागरिक कुत्री पाळतात पण त्यांना मोकाट सोडून देतात. प्राणी संवर्धन कायद्यानुसार कोणत्याही प्राण्याला मारता येत नाही. त्यामुळे कुत्र्यांची संख्या वाढत आहे. परंतु नसबंदी करून कुत्र्यांच्या वाढीला आळा घालता येऊ शकते. परंतु प्रशासन याबाबत उदासीन असल्याचे दिसून येते. याकडे नगर पंचायत प्रशासनाने लक्ष देऊन मोकाट कुत्र्यांची विल्हेवाट लावावी, अशी मागणी शहरवासीयांनी केली आहे.
मोकाट कुत्र्यांमुळे धानाेरावासीय त्रस्त
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 23, 2021 04:37 IST