वन विभागाने आग विझविली : मुख्य मार्गावर झाड पडल्याने वाहतूक ठप्पआलापल्ली : आलापल्ली-चंद्रपूर या मुख्य मार्गावरील बोरी गावालगतच्या जंगलाला गुरूवारी आग लागली. तसेच या आगीमुळे एक मोठे झाड मुख्य मार्गावर पडल्यामुळे काही वेळ या मार्गावरील वाहतूक ठप्प झाली होती. आलापल्ली वन विभागांतर्गत अहेरी वन परिक्षेत्रातील बोरी गावालगतच्या जंगलात गुरूवारी दुपारच्या सुमारास मोठ्या प्रमाणात आग लागली. या वनव्याने मुख्य मार्गाशेजारील एक मोठे झाड आगीत जळाल्याने ते मुख्य मार्गावर कोसळले. त्यामुळे काही वेळ या मार्गावरील वाहतूक विस्कळीत झाली होती. सायंकाळी वन विभागाच्या कर्मचाऱ्यांना या घटनेची माहिती कळताच त्यांनी तत्काळ घटनास्थळाकडे धाव घेऊन सदर आग आटोक्यात आणली. गुरूवारी रंगपंचमी सणाची धामधूम असल्याने वनकर्मचारी जंगलात फिरणार नाहीत, असा समज करून कुणीतरी जाणूनबुजून जंगलाला आग लावली असावी, ही आग नैसर्गिकरित्या लागलेली नाही, असे वनकर्मचारी सांगत आहेत. आग लावणाऱ्या आरोपींचा शोध वन विभागाचे कर्मचारी घेत आहेत. जंगलातील मेवा म्हणजे मोहफुल, टेंभुर वेचण्यासाठी बऱ्याचदा नागरिकांकडून जंगलाला आग लावली जाते. तेंदूपत्ता संकलनाच्या दृष्टीकोणातूनही जंगलाला आग लावली जाते. उन्हाळ्यात जिल्ह्याच्या पाचही वन विभागात रोज काही ठिकाणच्या जंगलांना वनवे लागत आहेत. काही दिवसांपूर्वी चामोर्शी वन परिक्षेत्रातील आष्टी तसेच आरमोरी वन परिक्षेत्रातील वैरागडच्या जंगल परिसरात वनवा लागला होता. वन विभागातर्फे वनव्यावर उपाययोजना केल्या जात आहे. मात्र उन्हाच्या दाहकतेमुळे आगीच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे. (प्रतिनिधी)
रंगपंचमीच्या दिवशी बोरी जंगलाला लागली आग
By admin | Updated: March 26, 2016 01:21 IST