सिराेंचा तालुक्यातील शेवटच्या टाेकावर असलेल्या गावांचे जिल्हास्थळापासूनचे अंतर जवळपास २०० किमी आहे. एवढ्या दूर अंतरावर जाऊन प्रशासकीय कामे करणे कठीण हाेत आहे. चंद्रपूर जिल्ह्याचा विस्तार माेठा असल्याचे लक्षात घेऊन गडचिराेली जिल्हा निर्माण करण्यात आला. त्यातही गडचिराेली जिल्हासुद्धा विस्ताराने अतिशय माेठा आहे. अहेरी उपविभागात सिराेंचा, मुलचेरा, भामरागड, एटापल्ली व अहेरी हे पाच तालुके येतात. हे तालुकेसुद्धा विस्ताराने अतिशय माेठे आहेत. तालुक्यातील शेवटचे गाव तालुकास्थळापासून सुमारे १०० किमी अंतरावर आहे. ये-जा करण्यासाठी रस्ते नाहीत. त्यामुळे तालुकास्थळ गाठतानाही नागरिकांची तारेवरची कसरत हाेत आहे. त्यामुळे अनेक नागरिक याेजनांपासून वंचित राहत असल्याचे दिसून येेते. नागरिकांची अडचण लक्षात घेऊन कमलापूर, जिमलगट्टा, आसरअल्ली, पेरमिली, जारावंडी, आष्टी, घाेट या नवीन तालुक्यांची निर्मिती करणे आवश्यक आहे. अहेरी येथे अपर जिल्हाधिकारी कार्यालय देण्यात आले आहे. स्वतंत्र जिल्ह्याची निर्मिती झाल्यास या भागाचा विकास हाेण्यास मदत हाेईल, अशी मागणी करण्यात आली आहे.
अहेरीचे अपर जिल्हाधिकारी यांच्यामार्फत शासनाला निवेदन पाठविण्यात आले. निवेदन देतेवेळी अहेरी जिल्हा निर्माण कृती समितीचे संस्थापक अध्यक्ष रघुनाथ तलांडे यांच्यासह संघटनेचे पदाधिकारी उपस्थित हाेते.